काँग्रेस अधिवेशनानिमित्त शहरात 26, 27 रोजी भरगच्च कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेत बेळगावात 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला शतक पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बेळगावात दि. 26 व 27 डिसेंबरला भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात दीडशेहून अधिक खासदार भाग घेणार आहेत. अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. शनिवार दि. 21 रोजी काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
स्वातंत्र्यपूर्वकाळात गांधीजींच्या नेतृत्वात बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी अधिवेशनात भाग घेतला होता. हा क्षण अविस्मरणीय असाच आहे. या प्रसंगावर प्रकाशझोत टाकण्यासाठी व हा कार्यक्रमही ऐतिहासिक ठरविण्याच्या उद्देशाने बेळगावात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. नियोजित काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निमित्ताने 26 डिसेंबर रोजी काँग्रेस विहिरीनजीक अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात काँग्रेसची कार्यकारी सभा होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 डिसेंबरला जनतेसाठी सभा होणार आहे. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. याशिवाय काँग्रेसचे वरिष्ठ व नेतेमंडळी सहभागी होणार आहेत, अशी माहिती जारकीहोळी यांनी दिली.
बेळगावात होणारे काँग्रेसचे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कायदामंत्री एच. के. पाटील, केंद्रीय माजी मंत्री वीराप्पा मोईली, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांसह 60 जणांची एक समिती नेमण्यात आली आहे. याचकाळात वीरसौध आवारातील महात्मा गांधी पुतळ्याचे अनावरण, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची उपस्थिती राहणार आहे.
काँग्रेसच्या अधिवेशनाची शहरात जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील प्रमुख चौकांना, इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्री जारकीहोळी यांनी दिली.
सी. टी. रवी प्रकरण वाढविण्यात काहीच अर्थ नाही. झालेल्या घटनेबद्दल पुन्हा पुन्हा उगाळणे यात काहीच अर्थ नाही. माफी मागितल्यानंतर प्रकरणावर पडदा टाकणे योग्य आहे. सी. टी. रवींना अडचणी येऊ नयेत यासाठी त्यांना खानापूरला पाठविण्यात आले. कोणाच्या सूचनेनुसार रवी यांना एका ठाण्यामधून दुसऱ्या ठाण्याकडे पाठवित आहेत? असा प्रश्न जारकीहोळी यांनी उपस्थित केला. रवींना रात्रीच्या रात्रीच कोर्टासमोर हजर करा, असे आपण पोलिसांना सांगितले होते. बेळगाव पोलिसांनी एवढे जरी केले असते तरी पुष्कळ झाले असते. मात्र, रवी यांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याभोवती कडे केले. यामागे अन्य कोणताही उद्देश नव्हता. कारण असे की रवी आपण अर्वाच्च शब्दात बोललो नाही, असे सांगत आहेत. सुवर्णसौधमध्ये असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. यावेळी झाला, याची खंत वाटते.