आ. रोहित पाटील यांच्या मॅरेथॉन बैठका
तासगाव :
आमदार रोहित पाटील यांनी निवडणुकीपूर्वी मतदारसंघात जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी बैठका घेत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जात आहे. या मॅरेथॉन बैठकांची जोरदार चर्चा होत आहे. राज्यात निधीची कमतरता असताना मतदारसंघातील विकासासाठी ते करत असलेली पळापळ कौतुकास्पद ठरली आहे. राज्यात पावसाळी अधिवेशनाची धामधूम सुरू आहे. या धामधुमीमध्ये तासगाव-कवठेमहांकाळचे युवा आमदार रोहित पाटील यांनी मतदार संघातील रखडलेल्या प्रकल्पांसाठी राज्य शासनाच्या विविध विभागात बैठकांचा धडाका लावला आहे. देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून परिचीत असलेले रोहित पाटील राज्य शासनाच्या विविध विभागांशी चर्चा करून मतदारसंघातील कामे मार्गी लावत आहेत.
कवठेमहांकाळ येथे नव्याने मंजूर झालेले अतिरिक्त न्यायालय, तासगाव शहरातील के आर.आर. आबा पाटील क्रीडासंकुल येथे नवीन होणारे काम व प्रस्तावीत कामांना खेलो इंडिया योजनेमध्ये घालण्याबाबत त्यांनी बैठक घेतली. तासगाव रिंग रोडची मार्गिका बदलत नागरिकांची घरे व जमिनी वाचवण्याचा निर्णय, तासगावमधील बायपास बाबत शेतकरी व अधिकाऱ्यांना विश्वासात घेत बैठक घेऊन योग्य दराचा मार्ग करण्यासाठी ते सरसावलेत. त्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे होणारे सबस्टेशन बाबत प्रस्ताव पुढे नेत पाठपुरावा केला. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन इमारत, तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व सिंचन प्रकल्प व टेंभू योजना जनजागृती मोहीम, योगेवाडी एमआयडीसी मधील प्रस्तावित व सुरु रस्त्यांची व पाण्याच्या पाईपलाइनची कामे अशा कामांचा धडाका लावला आहे. एमसीआरडीसी मुंबई येथे शक्तिपीठ बाधित शेतकरी व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेणे. अशा विविध कामासंदर्भात आ. रोहित यांनी पायाला भिंगरी लावून बैठकांचा सपाटा लावला आहे. रखडलेल्या प्रकल्पांसाठी सकारात्मक मार्ग निघत असल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.