गोव्यात मराठी शाळांचाच डंका
एकूण 687 पैकी तब्बल 630 सरकारी मराठी शाळा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विधानसभेत माहिती
पणजी : सध्या गोव्यात एकूण 687 सरकारी प्राथमिक शाळा आहेत. यापैकी एकूण 630 मराठी आहेत, तर 17 कोंकणी माध्यमातील आहेत. सर्वाधिक मराठी शाळा 98 सत्तरी तालुक्यात आहेत तर सगळ्यात कमी म्हणजेच 4 मुरगाव तालुक्यात आहे. गोव्यात मराठी माध्यमातून सर्वाधिक सरकारी प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. सासष्टीत 14, मुरगावात 2 तर तिसवाडी तालुक्यात फक्त एक मिळून गोव्यात 17 कोंकणी शाळा कार्यरत आहे. यावर्षी मराठीच्या 8 शाळा बंद पडल्या, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. याबाबत आमदार उल्हास तुयेकर यांनी अतारांकित प्रश्न विचारला होता.
प्राथमिक शिक्षकांच्या 347 जागा रिक्त
सध्या राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये 347 शिक्षक पदे आणि 14 प्रशिक्षित इंग्रजी शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या भरतीसाठीचा प्रस्ताव गोवा कर्मचारी निवड आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून रिक्त जागांमुळे शिक्षणावर होणारा परिणाम टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.