हलगा येथील मराठी शाळा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित
सांबरा /वार्ताहर
हलगा येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला तालुक्यातील आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शुक्रवार दि. 13 रोजी गांधी भवन येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्तीमठ शिवानंद स्वामीजी उपस्थित होते. गांधी भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, डाएट प्राचार्य नलतवाड, क्षेत्र शिक्षणाधिकारी एस. पी. दासपण्णावर, बीआरसी प्रमुख एम. एस. मेदार, हलगा सीआरपी एफ. एस. मुल्ला उपस्थित होते. महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हलगा सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला तालुकास्तरीय उत्कृष्ट शाळा हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मुख्याध्यापक प्रवीण कांबळे, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मोनाप्पा संताजी, सहशिक्षक व्ही. जी. घाटीबांधे, अश्विनी बागेवाडी, एस. बी. सफारे, एस. बी. भोसले, एम. ए. देसाई, आर. एम. घोरपडे, एम. व्ही. चौगुले, शाळा सुधारणा समितीचे सदस्य अनिल शिंदे, आशा संताजी, ज्योती संताजी, सुजाता संताजी व शाळेचे पालक भारती संताजी यांनी स्वीकारला.