भाषेच्या सन्मानासाठी मराठी माणूस एकवटला
भाषिक हक्कासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन : कन्नड सक्ती थांबवून मराठीला स्थान देण्याची मागणी
बेळगाव : भाषिक अधिकारांवर घाला घालण्यात आल्याने पेटून उठलेल्या मराठी भाषिकांनी सोमवारी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन एकप्रकारचा इशाराच दिला आहे. मराठी भाषेवर गदा आणल्यास जशास तसे उत्तर देऊ, या भावनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले होते. भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारशीप्रमाणे मराठी भाषिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मध्यवर्ती म. ए. समितीने हाक दिल्याप्रमाणे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने मराठी भाषिक जमा झाले. सकाळी 11 वाजल्यापासून बेळगाव, खानापूर तसेच निपाणी येथील कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले होते. महानगरपालिका, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत तसेच ग्राम पंचायतींमधील काढण्यात येत असलेले मराठी भाषेतील फलक पुन्हा बसवावेत, बेळगाव, खानापूर, निपाणी व अथणी या तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक असल्याने तेथे मराठीतून कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. महापौरांच्या वाहनांवरील मराठी भाषेतील फलक पुन्हा लावावा, यासह इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
जिल्हा प्रशासनाला इशारा
जिल्हाधिकाऱ्यांनी मराठी भाषिकांना दिलेले आश्वासन तसेच येता गणेशोत्सव हे विचारात घेऊन आज केवळ निवेदन देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने माहिती दिल्याप्रमाणे त्यांना अंमलबजावणीसाठी वेळ दिला जाणार असून त्यानंतरही मराठी भाषिकांचे प्रश्न तसेच राहिल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. यावेळी अॅड. अमर यळ्ळूरकर, युवा नेते शुभम शेळके, गोपाळ देसाई, अॅड. एम. जी. पाटील, रमाकांत कोंडुसकर यांनी मराठी भाषिकांना मार्गदर्शन केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणला
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासह इतर घोषणांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून निघाला. बऱ्याच दिवसांनी म. ए. समितीने असे रस्त्यावरील आंदोलन केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश पहायला मिळाला. बेळगाव शहरासह बेळगाव तालुका व खानापूरमधील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमले होते. यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, मध्यवर्ती म. ए. समितीचे प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील, अॅड. अमर यळ्ळूरकर, लक्ष्मण होनगेकर, आर. एम. चौगुले, अॅड. नागेश सातेरी, रामचंद्र मोदगेकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, चंद्रकांत कोंडुसकर, नेताजी जाधव, रणजित हावळाण्णाचे, महादेव पाटील, महादेव चौगुले, आनंद आपटेकर,
चंदू पाटील, माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे, माजी ता. पं. सदस्या निरा काकतकर, कमल मन्नोळकर, माजी नगरसेविका वैशाली हुलजी, तालुका म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्ष राजू किणयेकर, निपाणी तालुका अध्यक्ष अजित पाटील, नेताजी पाटील, आदित्य पाटील, माजी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, मोनाप्पा पाटील, महेश जुवेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संजय पाटील, आर. आय. पाटील, येळ्ळूर विभाग समितीचे राजू पावले, वामन पाटील, दत्ता उघाडे, दुदाप्पा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर, प्रकाश पाटील, सतीश देसूरकर, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सागर पाटील, प्रवीण रेडेकर, सचिन केळवेकर, विनायक कावळे, वासू सामजी, सूरज कुडूचकर, किरण हुद्दार, अशोक घगवे, विजय जाधव, रावजी पाटील, बी. ए. येतोजी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
बेळगाव जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था रहावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही केलेल्या आवाहनानुसार मराठी भाषिकांनी शांततेत निवेदन दिले. दोन्ही राज्यांमधील सीमावर्ती भागात होणारा संघर्ष टाळण्यासाठी यावर कायमस्वरुपी उपाय काढणे गरजेचे आहे. यासाठी दोन्ही राज्यांच्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातून मार्ग सुचवला जाणार आहे. तसेच कायद्याद्वारे जे अधिकार आहेत ते देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मराठी भाषिकांसमोर बोलताना स्पष्ट केले.