For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुद्रेमनी येथे उद्या मराठी साहित्य संमेलन

10:12 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुद्रेमनी येथे उद्या मराठी साहित्य संमेलन
Advertisement

यंदा आठरावे मराठी साहित्य संमेलन तीन सत्रात होणार :  संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर

Advertisement

वार्ताहर /कुद्रेमनी

येथील बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थांच्यावतीने होणारे यंदाचे आठरावे मराठी साहित्य संमेलन तीन सत्रात रविवार दि. 21 जानेवारी रोजी शाळांच्या पटांगणात कै. परशराम मिनाजी गुरव साहित्य नगरीत होत आहे. संमेलनासाठी अभ्यासू व विचारवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे.

Advertisement

साहित्य संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर

संमेलनाच्या पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष म्हणून ते विचार व्यक्त करणार आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे वास्तव्य करणारे असून ते प्रतिभावंत चतुर:स्त्र साहित्यकार आहेत. प्रसिद्ध चित्रपट गीतकार, पटकथा, संवाद लेखक, उत्कृष्ट अभिनेता, कवी, गायक अशा विविध भूमिका साकारणारे अष्टपैलू साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात. जवळपास 80 पेक्षा अधिक मराठी चित्रपटांसाठी व लोकप्रिय मालिकांसाठी  दर्जेदार गीतलेखन त्यांनी केले आहे. सत्ताधीश, झुंजार, नातं मामा भाचीचं, मी सिंधुताई सपकाळ, राजमाता जिजाऊ, सासर माझं दैवत, घुंगराच्या नादात अशा अनेक चित्रपटांसाठी आणि चिमणी पाखरं, बंदी शाळा, स्वराज्यजननी जिजमाता, क्रांतीसिंह नाना पाटीलसारख्या मालिकांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. अनेक चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे. गणगौळण सुरू झाली. चित्रपटात शाहिराची, घुंगराच्या नादामध्ये वडिलांची, तुझा दुरावामध्ये प्राध्यापकाची, शिवामध्ये प्राचार्यांची भूमिका दाद देणाऱ्या ठरल्या. त्यांच्या गीतांच्या पाचशेहून अधिक ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेले सांजगंध, पिळवण हे आदी काव्य संग्रह, भंडार भूल कथा संग्रह, पायपोल हे आत्मचरित्र आदीसारख्या अनेक साहित्यकृती प्रकाशित आहेत. ‘साहित्यगंध’ साहित्य संमेलनाचे ते पहिले संमेलनाध्यक्ष होते. मराठीचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी त्यांची खास मुलाखत घेतली होती. कविवर्य जगदीश खेबुडकर यांचा जीवनगौरव पुरस्कार, दिग्गज कवी ग. दि. माडगूळकर यांचा सर्वोत्कृष्ट गीतभार पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी मिळविले आहेत.

कवयित्री डॉ. पल्लवी परुळेकर, मुंबई

संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात कवी संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. साहित्यिक जगतातील अभ्यासू, विचारवंत व्यक्तिमत्त्व एम. एम. मराठी, एम. ए. इतिहास, एम. सी. ए. अशा विविध शैक्षणिक पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांनी संशोधन वृत्तीतून लेखन केले आहे. शब्दवेल, कला साहित्य, सांस्कृतिक परिषद साहित्य प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. त्यांच्या ‘इवल्याशा जाणिवेने’ कविता संग्रहाचे प्रकाशक ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे यांच्या हस्ते झाले. ‘क्षण ओघळते’ काव्य संग्रहाचे प्रकाशन सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले. पैठणी, पाऊलखुणा असे अनेक कविता संग्रह आहेत. ‘देहमूढ’ काव्यसंग्रहाला स्वदेशी भारत सन्मान अवॉर्ड मिळाला. इंडियन टॅलेंट लिटरेचर हा युनेस्कोचा अवॉर्ड त्यांना प्राप्त झाला आहे. मराठी ग्रामीण साहित्याचा अभ्यास संशोधनासाठी सुवर्णपदक, वीरांगणा सावित्री फुले राष्ट्रीय सन्मान पदक, कवड नारायण सुर्वे गौरव पुरस्कार, म. फुले साहित्यसागर उपाधी, कला सन्मान महाराष्ट्र अवॉर्ड, शांता शेळके पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत. अनेक काव्यसंग्रह, लघुकथा, ललितलेख, बालकविता संग्रह, अनेक संगीतबद्ध केलेली गाणी प्रसिद्ध आहेत.

कवी इंद्रजित घुले, सोलापूर

संमेलनाच्या तिसऱ्या सत्रातील कवी संमेलनात सहभागी कवी आहेत. सोलापूर जिल्हा मंगळवेढा ही जन्मभूमी. पुणे विद्यापीठाचे एम. ए. मराठीचे पदवीधर आहेत. आ. ह. साळुंखे विचार ग्रंथाचे संपादन. या वेशीपासून त्या वेशीपर्यंत हा काव्यसंग्रह. इरसाल झटका, राजकीय व्यंग काव्य, माझा दोस्त (कोकणीतून मराठीत अनुवाद). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व दिवाळी अंक शब्द शिवार यांचे संपादन केले आहे. त्यांच्या अनेक कविता, कथा, समीक्षा लेख नियतकालिकामधून प्रकाशित झाल्या आहेत. कविवर्य रा. ना. पवार प्रतिष्ठित सोलापूर पुरस्कार, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पुणे यांचा ग. दि. माडगुळकर पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पुणे, बाबुराव डिसले स्मृती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. पुणे, सोलापूर आकाशवाणी केंद्रावर, सह्याद्री वाहिनीवर त्यांच्या मुलाखती व काव्याचे सादरीकरण होत असते.

कवी संतोष काळे, सांगली

संमेलनातील सहभागी कवी पलूस येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. काव्य रचनेची आवड आहे. सर तुमचे शब्द रानगुज हे प्रकाशित असलेले काव्यसंग्रह, अखील भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग असून काव्य सादरीकरणात हातखंडा आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूस परिषदेच्या अध्यक्षपदाचे मानकरी आहेत. पलूस भूषण पुरस्कार, बंधूता साहित्य पुरस्कार, चंद्रपूर साहित्य मंडळ पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत.

कवी विश्वास पाटील, राधानगरी

साहित्याच्या काव्यप्रांतात वावरणारे कवी आहेत. विविध ठिकाणी होणाऱ्या काव्य स्पर्धा, संमेलनांमध्ये सहभागी असणारे अनुभवी कवी म्हणून ते ओळखले जातात. विद्रोही साहित्य संमेलन पुणे, चिंचवड साहित्य संमेलनांमध्ये सहभागी होऊन काव्य सादरीकरण त्यांनी केले आहे.

कवी अमृत पाटील, कुद्रेमनी

आध्यात्माचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व. सरकारी माध्यमिक हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. चित्रकलेची आवड. मूर्तिकलेत हातखंडा आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र नाशिक मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., एम.ए. पदव्यांचे पदवीधर  आहेत. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या व्यासपीठावरून कीर्तन, प्रवचने करतात. मुलांसोबत हरिपाठ वाचन करतात. काव्यरचनेची आवड त्यांना आहे. समाज प्रबोधन हा त्यांचा व्यासंग आहे.

संदीप मोहिते- सांगोला

सोलापूर जिल्हा तिप्पेहळ्ळी गावचे साहित्यिक. जुगलबंदी भारुडातून समाज प्रबोधन करण्यावर त्याचा भर आहे. व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहेत. संदीप मोहिते व आण्णा चव्हाण (सांगोला) या जोडीने एक हजार पेक्षा अधिक कार्यक्रम केले आहेत. आजची तरुण पिढी, स्त्रीभ्रूण हत्या, व्यसनमुक्ती, पर्यावरण वाचवा यासारख्या विविध विषयांवर भारुडांचे सादरीकरण करून समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतात.

Advertisement
Tags :

.