मराठी भाषेतील शुभेच्छा फलक मध्यरात्री हटविले
महापालिकेच्या कारभाराबाबत मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी
बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त शहर व उपनगरात लावण्यात आलेले मराठी भाषेतील शुभेच्छा फलक महापालिकेकडून मंगळवारी मध्यरात्री हटविण्यात आले. फलक हटविण्यास विरोध होईल, या भीतीने मध्यरात्री एकच्या दरम्यान महापालिकेकडून गणाचारी गल्ली, शिवाजीनगर, खडेबाजार, रविवार पेठ आदी ठिकाणचे फलक हटविण्यात आले आहेत. बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून पुणे व मुंबईच्या धर्तीवर बेळगावात गणेशोत्सव साजरा केला जातो. मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय असून गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मराठी भाषेतूनच शुभेच्छा फलक लावले जातात. यंदा काही कानडी संघटनांच्या दबावाला बळी पडून महानगरपालिकेकडून मराठी भाषेतील शुभेच्छा फलक हटविले जात आहेत.
गणेशोत्सवानिमित्त शनिमंदिर परिसरात लावण्यात आलेला मराठी भाषेतील फलक महापालिकेकडून काढण्यात आल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. उत्सव काळात भाषिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पुन्हा महापालिकेकडून तो फलक बसविण्यात आला होता. शहर व उपनगरात सगळीकडे मराठी भाषेतीलच शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. पण याचा काही कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. मराठी भाषेतील फलक हटविण्यात यावेत, यासाठी सातत्याने महापालिकेवर दबाव टाकण्यात येत होता. त्यामुळे गणेशोत्सव संपताच महापालिकेकडून शहर व उपनगरातील मराठी भाषेतील शुभेच्छा फलक हटविण्यास सुरुवात झाली आहे. दिवसा फलक काढल्यास विरोध होईल, या भीतीने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून चक्क मध्यरात्री फलक हटविण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान विविध ठिकाणी लावण्यात आलेले मराठी भाषेतील फलक काढून नेण्यात आले. महापालिकेच्या या कृतीमुळे मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मनपासमोर कन्नडिगांचा थयथयाट
गणेशोत्सव काळात शहरात लावण्यात आलेले मराठी भाषेतील फलक हटविण्यात यावेत, या मागणीसाठी बुधवारी कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर थयथयाट केला. कन्नड व्यतिरिक्त मराठी, ऊर्दू, इंग्रजी भाषेत फलक लावल्यास ते फाडले जातील. त्यामुळे महापालिकेने केवळ कन्नड भाषेतील फलक लावण्यास परवानगी द्यावी. कोणताही सण-उत्सव असो, कन्नड भाषेतीलच शुभेच्छा फलक लावण्यास अनुमती द्यावी, अशी हास्यास्पद मागणी यावेळी करण्यात आली.