‘मराठी’ शैक्षणिक पाऊल पडते मागे?
यंदा शैक्षणिक वर्षासाठी पहिल्या इयत्तेत फक्त 179 विद्यार्थ्यांचा प्रवेश : त्यातही उत्तर भारतीयांचा सहभाग : कृतिशील पावले उचलण्याची गरज
बेळगाव : ‘मी मराठी’ असे नारे देऊन मराठीपण जपले जाणार नाही, तर व्यवहारात मराठी भाषेचा वापर आणि मुलांना मराठी शाळेत दाखल करण्याचा निर्धार यामुळेच मराठी भाषा आणि संस्कृती टिकून राहणार आहे. असे असताना शहरातील मराठी शाळांना आता घरघर लागल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे मराठी शाळांचे अस्तित्वच नाहीसे होण्यापूर्वी मराठी म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाने कृतिशील पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव शिक्षण विभागाने नुकतीच यंदा पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या जाहीर केली. शहरातील 45 प्राथमिक शाळांमध्ये केवळ 179 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे शहरातील पाच शाळांमध्ये यावर्षी एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही. दहा शाळांमध्ये केवळ एका विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्याची नोंद आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत असल्याने मराठी शाळांना घरघर लागल्याचे चित्र आहे.
संपूर्ण शाळेचे विद्यार्थी एका वर्गात
बेळगाव म्हणजे मराठी आणि मराठी म्हणजे बेळगाव, असे समीकरण अनेक दशकांपासून होते. सीमाप्रश्नामुळे बेळगावमधील मराठी अस्तित्वाला एक वेगळेच महत्त्व होते. परंतु, मागील सात-आठ वर्षांमध्ये मराठी पालकांनी आपल्या मुलांना इतर माध्यमांमध्ये शिकविण्यास सुरुवात केल्याने सरकारी मराठी शाळांमधील पटसंख्या खालावत गेली. ज्या शाळेत काही वर्षांपूर्वी वर्ग अपुरे पडत होते, त्या शाळेमध्ये सद्यस्थितीला एकाच वर्गात संपूर्ण शाळेचे विद्यार्थी बसत आहेत. कणबर्गी, बसवण कुडची व वडगाव वगळता इतर कोणत्याही शाळेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दहापेक्षा अधिक नाही. या मानाने शहरातील कन्नड माध्यमाच्या शाळेत यावर्षी 1 हजार 22 तर उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये 364 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
मराठी शाळा वाचविण्यासाठीचे प्रयत्न
शिक्षण विभागाकडून मराठी, कन्नड व उर्दू शाळा वाचविण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु,पटसंख्याच नसेल तर नाईलाजास्तव शाळा बंद कराव्या लागणार आहेत. यासाठीच विभागवार केंद्रीय शाळा स्थापन करून आसपासच्या शाळांमधील विद्यार्थी या केंद्रीय शाळांमध्ये दाखल केल्यास विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढून प्रवेश वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच शिक्षण विभागाकडून अनगोळ, वडगाव, शहापूर, गणपत गल्ली अशा पाच-सहा केंद्रीय शाळा करून यामध्ये सर्व विद्यार्थी दाखल करण्याचा विचार सुरू आहे.
उत्तर भारतीयांवरच मराठी शाळांचा डोलारा
बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक रोजगार-व्यवसायासाठी दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांना कन्नड भाषा अवगत नाही. खासगी इंग्रजी शाळांमध्ये जाण्याइतपत घरची परिस्थिती नसल्याने या विद्यार्थ्यांना मराठी शाळांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मराठी व हिंदी या देवनागरी भाषा असल्याने उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मराठी शाळा आपल्याशा वाटत आहेत. शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, शिवाजीनगर, अनगोळ, महाद्वार रोड, शहापूर यासह इतर शाळांमध्ये नेपाळी, बिहारी, मारवाडी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.