मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये इन्फंट्री दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगावच्यावतीने 79 वा इन्फंट्री दिन साजरा करण्यात आला. देशसेवेमध्ये बलिदान दिलेल्या इन्फंट्रीच्या शूर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा लाईट इन्फंट्रीच्या शरकत युद्ध स्मारक येथे सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व ज्युनियर लिडर्स विंगचे कमांडर मेजर जनरल राकेश मनोचा यांच्या हस्ते शहीद वीरांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. भारतीय सैन्याचे शौर्य, त्याग आणि कर्तव्य यांची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली. इन्फंट्रीचा गौरवशाली इतिहास तसेच इन्फंट्रीने आजतागायत केलेले शौर्य याची माहिती ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी दिली. या कार्यक्रमाला डिफेन्स ऑफिसर्स यांच्यासह सैनिक, माजी सैनिक व हुतात्म्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर मराठा लाईट इन्फंट्री व ज्युनियर लिडर्स विंगमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.