Satara : संगम माहुलीत मराठा समाजाचा निर्धार संकल्प मेळावा
सातारा जिल्ह्यात मराठा समाज एकवटला
सातारा : सातारा तालुक्यातील ऐतिहासिक संगम माहुली या तीर्थक्षेत्रावर आज सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी ठाम संकल्प व्यक्त करण्यात आला.या संकल्प मेळाव्यात जिल्हाभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमादरम्यान शासनाला सोमवारी निवेदन सादर करण्यात येणार असून, 3 नोव्हेंबर पर्यंत मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास दहिवडी येथे अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संकल्प निर्धार मेळाव्याला जिल्ह्यातील पाटण तालुक्यातुन राजेंद्र बापुराव निकम, यशवंतराव जगताप, शंकरराव मोहीते, गणेश नायकवडी, प्रदीपराव घाडगे, शंकरराव मोरे, लक्ष्मण चव्हाण, प्रवीण उडुगडे, शिवाजी निकम, फलटण तालुक्यातून माऊली सावंत, प्रमोद सस्ते, रामभाऊ सपकाळ, माण तालुक्यातून सोहम शिर्के, बाळकृष्ण हास्पे, गंगाराम शिंदे, खटाव तालुक्यातून अरुण काकडे, लहू पवार, सातारा तालुक्यातून विशाल राजमाने, शिवाजी शिंदे, कराड विभागातून शामराव मोरे, धनाजी निकम आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात सातारा गॅझेटिअर तात्काळ लागू करावा, कुणबी नोंद असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र व जातपडताळणी प्रमाणपत्र सुलभतेने देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांची समिती नेमून शासन परिपत्रक जारी करावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेची ऑनलाईन एल.वाय. मंजुरी प्रक्रिया सुरू करावी, पंजाबराव देशमुख शालेय वसतीगृह योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना राहणीमान भत्ता तातडीने देण्यात यावा,
सातारा जिल्हा जाती पडताळणी समितीकडून होत असलेल्या कुचराईची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जातप्रमाणपत्र व टिपणी प्रक्रिया एकत्रित करून ती पूर्णपणे ऑनलाईन करावी,मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा व ओबीसी समाजांत वैमनस्य निर्माण केल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा, सासपडे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपीस त्वरित फाशीची शिक्षा द्यावी आदी मागण्यांचे ठराव करण्यात आले.सातारा जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन “एक मराठा, लाख मराठा” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्धपणे पार पडला असून, उपस्थितांनी आगामी लढ्यासाठी एकजूट राखण्याचा निर्धार व्यक्त केला.