सरकारने मराठा समाजाला फसवलं हे नक्की...कोल्हापूरातून नागपूरला हजारो काँग्रेस कार्यकर्ते जाणार- आमदार सतेज पाटील
भाजपला सध्या कोणत्याही प्रकारचा आत्मविश्वास नाही. त्यामुळेच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आहे. भाजपच्या या फोडाफोडीचा राग सामान्य नागकांना असल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. तसेच काँग्रेसच्या 138 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूरातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते नागपूरला जाणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला.
काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात आज माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, "काँग्रेसच्या 138 व्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये 'है तयार हम' या महा रॅलीचे आयोजन होत आहे. या महारॅलीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 3 हजार लोक नागपूरला जातील. देशातील काँग्रेसचे सर्व मोठे नेते या सभेसाठी येणार असून लोकसभेचे निवडणुकांचे रणशिंग नागपूरच्या महारॅलीमधून फुंकले जाईल." अशी माहीती त्यांनी दिली.
महायुतीवर भाष्य करताना सतेज पाटील म्हणाले, "महायुतीची समीकरणे जनमाणसांना पटलेली नाहीत. भाजपने आधी शिवसेना फोडली त्यानंतर राष्ट्रवादी फोडली. याचा राग लोकांना आहे. हा राग व्यक्त करण्याची संधी लोकांना लोकसभेमध्ये मिळणार आहे."असे त्यांनी म्हटले आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकींचा परिणाम लोकसभेवर होणार का यावर बोलताना ते म्हणाले, "या अगोदर इंडिया शायनिंग हेसुद्धा कॅम्पिंग भाजपने केलं होतं. त्यानंतर काय झालं हे देशाला माहित आहे. त्यामुळे तीन राज्याच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही. भाजपला महाराष्ट्रात लोकसभेचा कॉन्फिडन्स नाही. त्यामुळेच त्यांनी पक्षांची फोडाफोडी केली आहे."असे त्यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणावर शासनाच्या भुमिकेवर शंका उपस्थित करताना सतेज पाटील म्हणाले, "यापुर्वी दोन वेळा सरकारने मुदत वाढवून घेतली होती. फेब्रुवारी महिन्यात असं काय घडणार आहे जे या अधिवेशनात होऊ शकलं नाही. पाच ते सात मार्चला देशातील लोकसभेची आचारसंहिता लागेल.आरक्षण देता येत असतं तर त्यांनी आत्ताच दिला असतं पण त्यांना ते द्यायचं नाही. त्यामुळे हे सर्व फसवायचे काम चालू आहे.फसवलं गेलं हे नक्की आहे."असेही ते म्हणाले.