सांगली जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक; ग्रामीण भागात विविध ठिकाणी आंदोलन
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यावेळी जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन करण्यात आले.यावर जरांगे यांनी मराठा समाजाचा किती अंत पाहता, असा उलट सवाल केला.ही लढाई आरपारची असल्याचेही त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे. सांगली जिल्हा आणि ग्रामीण भागात याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
सावर्डे येथे सकल मराठा समाजाचे बेमुदत साखळी उपोषण
सावर्डे येथे सकल मराठा समाजाचे बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे.गुरुवारी गाव कडकडीत बंद ठेवून या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.
गुरूवारी सकाळी अकरा वाजता सावर्डे ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणासंदर्भात ग्रामसभा बोलविण्यात आली आहे. मनोज जरांगे - पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देणेसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. या साखळी उपोषणामध्ये सुशांत माने, गजानन जाधव, प्रणव जाधव,गणेश जाधव हे युवक उपोषणानास बसले आहेत. मराठा आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण चालू राहील. सावर्डे गावातील सर्व व्यवहार आज कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत. गावातील मराठा बांधवाकडून या उपोषणाला पाठिंबा वाढत आहे.
आरक्षणासाठी सावळजमध्ये उपोषण, रॅली, मशालफेरी
तासगाव तालुक्यातील सावळज येथे मराठा समाजाच्यावतीने आरक्षणासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आरक्षणासाठी गुरुवारी सावळजमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच मराठा व धनगर समाजाच्यावतीने मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या लाक्षणिक उपोषणास विद्यार्थीसह विविध समाज व संघटनांनी पाठिंबा दिला. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा व मराठा समाजाच्या आरक्षणाची सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्याने आक्रमक झालेल्या येथील मराठा समाजाच्यावतीने राजकीय नेत्यांना गाव प्रवेश बंदी घातल्यानंतर लाक्षणिक उपोषण केले. तर मराठा समाजाच्यावतीने महिला, लहान मुलांच्या सह मराठा बांधवांनी गावातील प्रमुख मार्गावरून मशालफेरी काढण्यात आली.मराठा आरक्षणासाठी सावळज येथील लाक्षणिक उपोषण आंदोलनास शालेय विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला. आंदोलन ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी ठिय्या मारुन मराठा विद्यार्थ्यांनी आरक्षणाविषयी भावना व्यक्त केल्या. तर सावळज सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला उत्स्फूर्तपणे व्यापारी वर्गाने पाठिंबा दिला.तसेच मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सकाळी प्रमुख मार्गावरून घोषणा देत मोटरसायकल रॅली काढण्यात आली.