मराठा को-ऑप. बँक संचालक मंडळाची उद्या निवडणूक
कुद्रेमनीत प्रचार जोमात : भाग्यलक्ष्मी सोसायटीत सर्व उमेदवारांचे स्वागत
बेळगाव : मराठा को-ऑप. बँकेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि. 22 रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत होणार आहे. यानिमित्त कुद्रेमनी गावामध्ये दि. 20 रोजी सकाळी 9 वाजता प्रचार करण्यात आला. भाग्यलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी येथे सर्व उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. शिवाजी शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक बाळासाहेब काकतकर यांनी कै. अर्जुनराव हिशोबकर, कै. शिवाजीराव काकतकर, कै. बाबुराव हंडे यांचे पुण्यस्मरण, बँकेचे व कुद्रेमनी गावाचे नाते किती दृढ आहे हे सांगितले. सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बिनविरोध निवडून आलेले प्रशांत चिगरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. मतपत्रिकेबद्दल नागेश राजगोळकर यांनी माहिती दिली. रवि पाटील यांनी सत्ताधारी पॅनेल विजयी होणार अशी ग्वाही दिली. चेअरमन दिगंबर पवार यांनी कै. ईश्वर गुरव यांची उणीव भासत असल्याचे सांगितले. भाग्यलक्ष्मी सोसायटीच्या संचालकांचे अभिनंदन करून आभार मानले.
14 मते देण्याचे आवाहन
महिला गटातील उमेदवार रेणू किल्लेकर यांनी मतदारांना एकूण 14 मते द्यावयाची असून सामान्य गटासाठी 9, महिला गटासाठी 2, मागास ब साठी एक एससी व एसटीसाठी प्रत्येकी एक अशा एकूण 14 चित्रांवर शिक्का मारून उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यानंतर सुळगा, हिंडलगा येथील मतदारांची भेट घेऊन सत्ताधारी पॅनेलला मत देण्याचे आवाहन केले.