‘मराठा चौक’चे दिमाखात उद्घाटन
लोकमान्य को-ऑप. सोसायटीकडून सौंदर्यीकरण
बेळगाव : कॅम्प येथील ‘मराठा चौक’चे शुक्रवारी दिमाखदार उद्घाटन झाले. लोकमान्य को-ऑप. सोसायटीकडून मराठा चौकचे सौंदर्यीकरण करण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते मराठा चौकचे उद्घाटन झाले. बिग्रेडियर जॉयदीप मुखर्जी म्हणाले, मराठा चौकच्या नूतनीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात नव्याने भर पडली आहे. लोकमान्य सोसायटीने अतिशय उत्तमरित्या हा चौक तयार करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मिटींगमधून मंजुरी मिळवत या चौकचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यापुढेही लोकमान्य सोसायटी तसेच डॉ. किरण ठाकुर यांनी शहराच्या विकासात योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
यापुढेही उपक्रम राबविण्याचे आश्वासन
मराठा लाईट इन्फंट्रीसोबत लोकमान्य सोसायटीने यापूर्वीही अनेक उपक्रम राबविले आहेत. शिवतीर्थ येथील शिवसृष्टी, मराठा इन्फंट्रीमध्ये संग्रहालय, रुग्णवाहिका असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.देशाचे नेतृत्त्व करणारी मराठा लाईट इन्फंट्री बेळगावमध्ये असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे यापुढेही असे उपक्रम राबवून भारतीय सैन्याचे नाव उंचावू, असे डॉ. किरण ठाकुर यांनी सांगितले. यावेळी लोकमान्य सोसायटीचे व्हा. चेअरमन अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, सीएफओ निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, सीईओ अभिजीत दीक्षित, कर्नल विनोद पाटील,श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर,कॅन्टोन्मेंटचे सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर, कॅन्टोन्मेंटचे अभियंता सतीश मन्नोळकर, सुप्रिटेंडंट एम. वाय. ताळूकर, बाळासाहेब काकतकर, सुहास किल्लेकर, श्रीकांत देसाई, नारायण किटवाडकर, रमेश हन्नीगेरी, शेखर हंडे यांच्यासह लोकमान्य सोसायटीचे कर्मचारी व मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान उपस्थित होते.