‘मॅप माय इंडिया’ची डिजिपिनसोबत जोडणी
चुकीचे ठिकाण सांगण्याची समस्या कमी होणार : डिजिपिनच्या अॅपसोबत 10 अंकी कोड प्राप्त होणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
‘मॅप माय इंडिया’ने इंडिया पोस्टच्या डिजिपिनला आपल्या मॅपल्स अॅप सोबत जोडले आहे. आता या नव्या फिचर्ससोबत कोणताही व्यवसाय आपले घर, दुकान किंवा कोणत्याही जागेसाठी एक युनिक 10 अंकांचा अल्फान्यूमेरिक कोड बनविता येणार आहे. या योजनेचा उद्देश असा आहे, की सामान्य नागरिक आणि व्यावसायिक यांच्यासाठी एक युनिव्हर्सल डिजिटल अॅड्रेस तयार केला जातो. हे फिचर आता मॅपल्स अॅपवर लाईव्ह आणि सर्व वापरकर्त्यांसह सोबत डेव्हलपर्स आपल्या प्लॅटफॉर्म आणि सर्व्हिसेसचा वापर करता येईल. मॅपमाय इंडिया त्यांच्या मॅपल्स पिनमध्ये इमारतीचे नाव, मजला क्रमांक आणि जवळच्या खुणा यासारखी माहिती असेल. या दुहेरी प्रणालीमुळे पूर्वी नकाशावर नसलेला भाग जसे की, ग्रामीण भाग किंवा अनियोजित वसाहतीमध्ये देखील अचूक स्थान शोधणे या नव्या प्रणालीच्या सोईमुळे खूप सोपे झाले आहे.
काय आहे इनोव्हेटिव्ह डिजिटल अॅड्रेस सिस्टम?
डिजिपिन म्हणजे डिजिटल पोस्टल इंडेक्स नंबर आहे. इंडिया पोस्टची एक इनोव्हेटिव्ह डिजिटल अॅड्रेस सिस्टम आहे. हा 10 अंकी कोड असून हा कोणत्याही जागेचा पिनपाँईट करतो. जुन्या 6 अंकी पिनकोडच्या तुलनेत डिजिपिन 4 मीटर बाय 4 मीटरच्या लहान ग्रिडपर्यंतच्या लोकेशनची माहिती दिली जाते.
ही सेवा म्हणजे ऐतिहासिक पाऊल : वर्मा
मॅपमाय इंडियाचे सहसंस्थापक आणि सीएमडी राकेश वर्मा यांनी या सेवेला ऐतिहासिक पाऊल म्हटले आहे. या एकत्रिकरणामुळे एक अब्जाहून अधिक भारतीयांना त्यांच्या घरांसाठी आणि व्यवसायासाठी डिजिटल पत्ता मिळेल.
कसे वापरावे मॅपल्स अॅप
- आपले स्थान प्रविष्ठ करावे किंवा नकाशावर पिन टाकावा
- तुमचा डिजिपीन त्वरित तयार होईल
- तयार झालेला पिन हा डिलिव्हरीसाठी किंवा मित्रांसोबत, सेवा देणाऱ्याला शेअर करता येईल
- ग्रामीण भागात असल्यास मॅपल्स पिन जवळच्या लँडमार्कसह संबंधीत स्थान अधिक अचूकपणे दर्शवणार