तुरमुरी ग्रा.पं.ची मासिक बैठकच नसल्याने अनेक कामे खोळंबली
तातडीने ग्रामपंचायतची बैठक घ्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा
वार्ताहर/उचगाव
तुरमुरी ग्राम पंचायतने गेले पाच महिने मासिक बैठकच बोलावली नसल्याने ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. जनतेची कुचंबणा होत असून अनेक शासकीय कामे कशी करावीत, हा मोठा प्रश्न जनतेसमोर आवासून सध्या उभा आहे. याच निषेधार्थ गावातील ग्रामस्थांनी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत यांना निवेदन दिले. तातडीने ग्रामपंचायतीची बैठक घ्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
तुरमुरी ग्राम पंचायतची मासिक बैठक गेले पाच महिने बोलाविण्यात न आल्याने तुरमुरी ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांतील नागरिकांची अनेक कामे खोळंबून राहिली आहेत. मात्र ग्राम पंचायतीने बैठक का घेतली नाही यामागचे गूढ काय, असा संतापजनक प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. सोमवारी सकाळी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांना याचा जाब विचारत हे निवेदन सादर केले.
तुरमुरी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात तुरमुरी आणि बाची ही दोन गावे येतात. गेले पाच महिने या ग्राम पंचायतीची मासिक बैठक न घेतल्याने ग्रामस्थांची अनेक विविध कामे खोळंबून आहेत. या कामामुळे पुढील अनेक कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेणे गरजेचे आहे. जर येत्या आठवडाभरात ग्रामपंचायतने मासिक बैठक घेऊन नागरिकांची जी कामे आहेत त्यांना चालना दिली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन याचा जाब विचारला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.
उतारे मिळणे बंदच
ग्रामपंचायतने बैठक घेतली नसल्याने नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक कामासाठी तसेच विद्युत पुरवठा, घराची बांधणी अशा अनेक कामांसाठी एनओसी सर्टिफिकेट लागते. ते सध्या मिळणे बंद झाले आहे. अनेक जणांची घरे नोंद करायची आहेत. यामुळे पुढील कार्यवाही थांबली आहे. अनेक नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक कामासाठी कॉम्प्युटर उतारा पाहिजे. मात्र मीटिंग नसल्याने कॉम्प्युटर उताराही देणे बंद केले आहे. अनेक जणांची बँकेतून कर्ज प्रकरणे करणे थांबली आहेत. यासाठी तातडीने बैठक घेणे महत्त्वाचे आहे.
- वैशाली खांडेकर.
अध्यक्ष-पीडीओंची मनमानी
बैठका नसल्याने रोजगार हमी योजने अंतर्गत मिळणारी कामे सध्या थांबली आहेत. गावातील गटारींची स्वच्छता, रस्त्यांची अनेक कामे थांबली आहेत. सध्या ग्राम पंचायतचा गलथान कारभार सुरू आहे. अनेक योजनेअंतर्गत 21 लाखाची कामे घातलेली आहेत. त्या निधीचे काय झाले, याचा कोणालाही थांगपत्ता नाही. अनेक जणांना मरण उतारे हवे आहेत ते मिळत नाहीत. घरांची नोंदणी केली जात नाही. अध्यक्ष, पीडीओ यांचा मनमानी कारभार या सुरू आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे.
- मारुती खांडेकर.