भिंत कोसळून अनेक कामगार जखमी
कनौज रेल्वेस्थानकावरील प्रतिक्षालयाचे काम सुरू असताना दुर्घटना
वृत्तसंस्था/ .कनौज (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशातील कनौज शहरात एका निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळून झालेल्या अपघातात अनेक कामगार भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 23 कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. बचावकार्याला त्वरित प्रारंभ करण्यात आला असून आपत्कालीन साहाय्यता दले अपघातस्थळी पोहचली असल्याची माहिती आहे. दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
कनौज रेल्वेस्थानकाच्या एका टर्मिनलचे बांधकाम होत असताना ही घटना घडली. आतापर्यंत 23 जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. यापैकी 7 जणांना तिरवा येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे. जखमींपैकी 3 कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आली. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. अनेक कामगारांची सुटका करण्यात आली असून ते सुरक्षित आहेत, अशी माहिती कानपूर विभाग रेल्वे अधिकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी दिली.
सौंदर्यीकरण करताना अपघात
इमारतीची भिंत कोसळली तेव्हा कामगार रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाच्या कामात व्यग्र होते. दुर्घटना झाल्यानंतर तातडीने आपत्कालीन साहाय्यता दलांना पाचारण करण्यात आले. स्थानिकांनीही भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. सर्व कामगारांची सुटका करण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
उच्चस्तरीय चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कन्नौजमधील या अपघाताची दखल घेतली आहे. अपघातस्थळी तातडीने मदतकार्याला गती देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमींना चांगल्या उपचारांसाठी आणि त्यांच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. यासोबतच, त्यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत.