For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहने अनेक, मात्र ती नादुरुस्त!

11:03 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाहने अनेक  मात्र ती नादुरुस्त
Advertisement

मनपाच्या कारभाराबद्दल संताप 

Advertisement

बेळगाव : पावसामुळे अनेक ठिकाणी कचरा अडकून पाणी तुंबत आहे. पूरही येण्याची भीती व्यक्त होत आहे. बुधवारी शिवाजी रोडवरील लेंडी नाल्यामध्ये प्लास्टिकचा कचरा, गाद्या आणि उशा अंबाभुवनजवळील पुलामध्ये अडकून मोठ्या प्रमाणात  पाणी साचले. त्याची सफाई करण्यासाठी जेसीबीची मागणी मनपाकडे केली. मात्र, दोन जेसीबी नादुरुस्त असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली. याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनपाची अनेक वाहने नादुरुस्त असून, त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अनेक वाहने कुचकामी

Advertisement

शहरातील कचरा वाहतूक करणे, गटारी साफ करणे, ड्रेनेज पाईप घालताना खोदाई करण्यासाठी जेसीबी तसेच इतर वाहने मनपाने खरेदी केली आहेत. मात्र, यामधील अनेक वाहने नादुरुस्त आहेत. त्यामुळे ही वाहने खरेदी करूनही कुचकामी ठरली आहेत. याबाबत बैठकांमध्ये विचारणा केली असता सर्व काही आलबेल आहे, असे मनपा अधिकारी सांगत असतात. मात्र, जेव्हा काम असते, त्यावेळी मात्र वाहने नादुरुस्त असल्याची कारणे दिली जातात.

कचरा पाहून अभियंत्या अवाक्

जोरदार पावसामुळे नाले, गटारींमध्ये कचरा अडकून रहात आहे. त्यामुळे पाण्याला पुढे जाण्यासाठी वाटच नसल्यामुळे घरांमध्ये पाणी शिरत आहे. अशावेळी नगरसेवक किंवा नागरिकांनी तक्रार केल्यानंतर मनपाचे अधिकारी दाखल होतात. त्यावेळी अमूक यंत्र पाहिजे, असे ते सांगतात. मात्र, मनपाकडील यंत्रे एक तर नादुरुस्त असतात किंवा ती उपलब्ध नसतात. बुधवारी शिवाजी रोडवर असाच प्रकार घडला. त्यानंतर मनपाच्या मुख्य अभियंता लक्ष्मी निपाणीकर या त्या ठिकाणी दाखल झाल्या. नाल्यातील साठलेला कचरा पाहून त्याही अवाक् झाल्या.

मनपाचा कारभार चव्हाट्यावर

या परिसरातील नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांना आता जेसीबीही नाही, त्यामुळे करायचे काय? असा प्रश्न पडला. शेवटी महानगरपालिकेचा एक जेसीबी सुरू होता. मात्र, तो इतरत्र कचरा काढण्यासाठी गेला होता. त्याला तातडीने सूचना करून बोलावून घेतले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तेथील कचरा काढण्याचे काम सुरू होते. या प्रकारामुळे मनपाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. याकडे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.