सरकारचे अनेक निर्णय महत्त्वाकांक्षी, ऐतिहासिक
सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळकर यांचे प्रशंसोद्गार : राज्याचा विकास करण्याचे प्रयत्न
प्रतिनिधी/ पणजी
विधानसभेच्या माध्यमातून सरकाराने घेतलेले काही निर्णय हे ऐतिहासिक स्वरुपाचे आहेत. अंत्योदय तत्त्वावर चालणारे हे सरकार सर्वांना सोबत घेऊन राज्याचा विकास करण्याचे प्रयत्न करत आहे, असे प्रशंसोद्गार भाजप सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळकर यांनी काढले.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महासचिव सर्वानंद भगत आणि राज्य सचिव दीपक नाईक यांची उपस्थिती होती. या सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांपैकी गेल्या कित्येक वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना तात्पुरते कर्मचारी म्हणून दर्जा देऊन पगारवाढीसह अन्य विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. हा निर्णय समाजाच्या दुर्बल घटकातील शेकडो कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा व त्या माध्यमातून किमान 3500 कुटुंबांच्या अपेक्षा उंचावणारा ठरणार आहे, असे ते म्हणाले.
दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे, गोमंतकीयांची बेकायदेशीर नव्हे तर अनियमित घरे कायदेशीर करण्यात येणार आहेत. वर्ष 1972 पूर्वी बांधण्यात आलेल्या व सर्वेक्षण क्रमांक असलेल्या किमान 1 लाख घरांना या महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक निर्णयाचा लाभ होणार आहे.
असाच निर्णय यापूर्वी 2007 मध्येही घेण्यात आला होता. परंतु त्यासंबंधी जारी करण्यात आलेले परिपत्रक एवढे जटील व किचकट होते की, त्यातील काही अटी पाहता त्या केवळ राजवाड्यासारख्या आकाराच्या बड्या घरांनाच लागू होतील अशाप्रकारे काढण्यात आल्यासारखे वाटत होते. विद्यमान सरकारने सामान्य गरीब गोमंतकीयांचे हेच दुखणे ओळखून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ते पूर्ण परिपत्रकच बदलून टाकले व त्यात एक किरकोळ अट म्हणजेच 1970-72 च्या पूर्वी बांधण्यात आलेली व सर्वेक्षणात नोंद झालेली घरे कायदेशीर करून त्या घरमालकांना सनद जारी करण्याचा निर्णय जाहीर केला, अशी माहिती कुंकळकर यांनी दिली. या निर्णयामुळे लाखो घरमालकांना कायदेशीर मालकी हक्क प्राप्त होणार असून घराची दुऊस्ती, विस्तार करण्यासाठी येणाऱ्या अडचणींपासून मुक्तता मिळणार आहेत, असे ते म्हणाले.