रिक्त जागेसाठी अनेकांची नावे चर्चेत
गोविंद गावडेंचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार: रविवारी माशेल येथील सभेत उघडणार आपले पत्ते
विशेष प्रतिनिधी/ पणजी
माजी मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी कोणाची वर्णी लावावी, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अनेक नेत्यांची नावे चर्चेला येऊ लागली आहे. दरम्यान माजी मंत्री गोविंद गावडे यांनी काल शुक्रवारी त्यांच्याच मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तर दुसऱ्या बाजूने येत्या रविवारी मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांची सभा आयोजित करून त्यात बराच मोठा खुलासा तसेच भाजपला आव्हान देण्याचा इरादा ठेवला आहे.
मंत्रीपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर गोविंद गावडे हे बरेच संतापलेले आहेत. गेल्या दोन दिवसात त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर रविवारी खांडोळा येथे बिग बी हॉलमध्ये जाहीर सभा घेऊन आपली बाजू मांडण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्याच दिवशी ते कोणत्यातरी निर्णयाची घोषणा करतील असा अंदाज आहे. रविवारी होणाऱ्या सभेत शक्तिप्रदर्शन घडविण्याच्या प्रयत्नात ते आहेत.
विश्वास सतरकर यांचे आव्हान
भारतीय जनता पार्टीने प्रियोळचे माजी आमदार अॅडव्होकेट विश्वास सतरकर यांना पुढे काढले असून त्यांना राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्षपद देखील दिले आहे. सतरकर हे गोविंद गावडे यांच्यासाठी आव्हान ठरले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष विश्वास सतरकर यांना पुढे काढण्याचा विचार करीत आहे. त्या अनुषंगाने आता सतरकर पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रयत्न करतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर गोविंद गावडे यांनी आपले धोरण निश्चित केले आहे ते नेमका कोणता निर्णय घेतील हे आताच सांगणे कठीण आहे परंतु उद्या 22 जून रोजी होणार असलेल्या जाहीरसभेत ते फार मोठी घोषणा करणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
सभापती रमेश तवडकर यांना असंख्य नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले आहेत. रमेश तवडकर हे डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होणार आहेत. इतर दोन मंत्री नेमके कोण? याचा खुलासा देखील पुढील आठवड्यात होईल. विधानसभा अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जाणार असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.
मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील
गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाची रचना, पुनर्रचना याबाबतचे सारे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतात. त्यामुळे आपण त्यावर भाष्य करू इच्छित नाही. मुख्यमंत्रीच निर्णय घेतील आणि योग्यवेळी आपल्याला माहिती मिळेल, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेबाबत संपूर्ण गोव्यात विविध पद्धतीने चर्चा रंगू लागली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
महामंडळांची होणार पुनर्रचना
प्राप्त माहितीनुसार भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांची महामंडळांवर नियुक्ती केली जाणार आहे. महामंडळाचे अध्यक्षपदही काही जणांना दिले जाणार आहे. भाजपने आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महामंडळांची पुनर्रचना करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे काहींची महामंडळांवरील पदे जाणार असून काही निष्ठावान कार्यकर्त्यांना ही पदे मिळण्याची शक्यता आहे.