फिलिपाईन्ससोबत अनेक सामंजस्य करार
फिलिपाईन्सचे अध्यक्ष मार्कोस ज्युनियर भारत दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी भारत दौऱ्यावर आलेले फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनेंड आर. मार्कोस ज्युनियर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान मैत्रिपूर्ण आणि दृढ संबंधांचा विस्तार करण्यासाठी चर्चा झाली आहे. तसेच या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान अनेक करार झाले आहेत. हे करार व्यापार, सुरक्षा, शिक्षण आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमधील भागीदारी वृद्धींगत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
भारत आणि फिलिपाईन्सदरम्यान संस्कृती, इतिहस आणि लोकांदरम्यान मजबूत संबंधांवर आधारित जुने नाते आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेचा उद्देश दोन्ही देशांची मैत्री आणि परस्पर सहकार्य आणखी मजबूत करणे आहे. या चर्चेमुळे द्विपक्षीय संबंध मजबूत होण्यासह अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढणार असल्याचे विदेश मंत्रालयाने एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे.
भारत आणि फिलिपाईन्स हे स्वत:च मर्जीने मित्र आहेत आणि ही मैत्री नियतिशी जोडलेली आहे. हिंदी महासागरापासून प्रशांत महासागरापर्यंत दोन्ही देशांना संयुक्त मूल्यं जोडतात. ही मैत्री केवळ जुनी नसून भविष्यासाठी देखील एक मजबूत आश्वासन आहे. भारताचे अॅक्ट ईस्ट धोरण आणि महासागर व्हिजनमध्ये फिलिपाईन्स एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे. दोन्ही देश हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता, सुरक्षा, समृद्धी आणि नियमांवर आधारित व्यवस्थेसाठी प्रतिबद्ध आहे. पुढील वर्षी फिलिपाईन्स आसियानचा अध्यक्ष असेल, ज्याच्या यशस्वी संचालनासाठी भारत पूर्ण मदत करणार असल्याचे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत.
सर्व स्तरावर सहकार्य जारी
दोन्ही देशांदरम्यान सर्व स्तरांवर चर्चा आणि सहकार्य जारी असल्याचे मोदींनी सांगितले. या बैठकीत भारत-फिलिपाईन्स संबंधांना रणनीतिक भागीदारीच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. या भागीदारीला यशस्वी करण्यासाठी एक विस्तृत कार्ययोजनाही तयार करण्यात आली आहे. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार 3 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाला आहे. या संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी भारत-आसियान मुक्त व्यापार कराराची समीक्षा लवकर पूर्ण करणे आणि द्विपक्षीय प्राधान्य व्यापार करारावर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
द्विपक्षीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण
मार्कोस ज्युनियर यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी द्विपक्षीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला आहे. आमचे कूटनीकि संबंध नवे असले तरीही आमच्या संस्कृतीचा संबंध अत्यंत जुना आहे. फिलिपाईन्समध्ये रामायणाची कहाणी ‘महारादिया लवाना’ याचे मोठे उदाहरण आहे जे आमच्या शतकांपेक्षा जुन्या सांस्कृतिक बंधाला दर्शविते असे उद्गार मोदींनी काढले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा करणे आणि भारतासोबत उभे राहिल्याबद्दल फिलिपाईन्स सरकार आणि अध्यक्षांचे आभार मानतो. दहशतवाद विरोधातील या भूमिकेमुळे दोन्ही देशांचे संबंध मजबूत झाल्याचे मोदींनी म्हटले आहे.