मनू भाकर, कुसाळे भारतीय संघात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयएसएसएफच्या विश्व चषक रायफल-पिस्तुल विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या म्युनिच टप्प्याला 8 जूनपासून प्रारंभ होणार असून या स्पर्धेसाठी अखिल भारतीय नेमबाजी फेडरेशनने मंगळवारी 23 सदस्यांचा संघ घोषित केला. या संघामध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेते नेमबाज मनू भाकर आणि स्वप्नील कुसाळे यांचा समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेत मनु भाकर महिलांच्या 10 मी. आणि 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करेल. या संघामध्ये संदीप सिंगचे पुनरागमन झाले आहे. तो पुरुषांच्या एअर रायफल नेमबाजीत भाग घेईल. पॅरिसऑलिम्पिक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच स्वप्नील कुसाळे आणि संदीप सिंग पुन्हा एकत्रीत विश्वनेमबाजीत स्पर्धेत येत आहे. आयएसएसएफचे विश्वचषक नेमबाजीचे पहिले दोन टप्पे अर्जेंटिना आणि पेरु येथे झाले. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताने एकूण 6 सुवर्णांसह 15 पदकांची कमाई केली आहे. म्युनिचमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राची राष्ट्रीय चॅम्पियन अनन्या नायडू प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे. हरियाणाची आदित्या मालरा, सेनादलाचा नेमबाज निशांत रावत यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र रुद्रांश पाटील आणि ऐश्वर्य तोमर यांनी मात्र स्वत:हून या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याने कळविले आहे.