पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरचा ‘कांस्य’ वेध
10 मी एअर पिस्तूल प्रकारात यशस्वी कामगिरी : नेमबाजीत पदक मिळवणारी पहिली महिला
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताची 22 वर्षीय युवा नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत मनू भाकरने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. कोरियाच्या दोन्ही खेळाडूंना सुवर्ण व रौप्यपदक मिळाले. विशेष म्हणजे, ऑलिम्पिक इतिहासात नेमबाजीत पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. याशिवाय, महिलांच्या 10 मी एअर रायफल प्रकारात भारताच्या रमिता जिंदालने अंतिम फेरी गाठली आहे.
शनिवारी 10 मी एअर पिस्तूल प्रकारात मनूने पात्रता फेरीत तिसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरी गाठली होती. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत तिने 221.7 गुणाची कमाई करत कांस्यपदक पटकावले. दक्षिण कोरियाच्या ओ ये जिनने 243.2 गुणांसह सुवर्ण तर किम येजीने 241.3 गुणांसह रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत आठ स्पर्धकांचा सहभाग होता. फायनलमध्ये सुरुवातीला पाच शॉट्सच्या दोन फेरी असतात. पहिल्या व दुसऱ्या फेरीमध्ये मनू दुसऱ्या स्थानी होती. यानंतर तिसऱ्या फेरीत मात्र मनूची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. यानंतर कोरियन खेळाडूंनी वर्चस्व ठेवत सुवर्ण व रौप्यपदकाला गवसणी घातली. मनूला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मनू भाकरने तब्बल 12 वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक मिळवून दिले आहे. भारताला या खेळात 2012 मध्ये शेवटचे ऑलिम्पिक पदक मिळाले होते.
ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतील अनेक इव्हेंटमध्ये मनूचा सहभाग
मनू भाकरने यंदाच्या ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल, 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक आणि महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेतला आहे. 21 सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव अॅथलीट आहे जी इतक्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. मनू भाकर हरियाणातील झज्जर जिह्यातील गोरिया गावातील रहिवासी आहे. तीन वर्षापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले असते. पंरतु ऐनवेळी तिच्या पिस्तूलात बिघाड झाला अन् तिचा फायनलमधील प्रवेश हुकला. यानंतर यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मात्र तिने ऑलिम्पिक पदकाची स्वप्नपूर्ती केली आहे.
नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला
ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक जिंकणारी भारताची पाचवी नेमबाज तर पहिलीच नेमबाज ठरली आहे. याआधी भारतासाठी राजवर्धनसिंग राठोड (2004), अभिनव बिंद्रा (2008), विजय कुमार (2012) व गगन नारंग (2012) यांनी ऑलिम्पिक पदक जिंकले आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मनूचे कौतुक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मी एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मनूचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह भारतीय ऑलिम्पिक महासंघ, केंद्रीय क्रीडामंत्री मनसूख मांडविया, आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिनव बिंद्रा, गगन नारंग यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितले होते, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरु होते. कुटुंब, प्रशिक्षक आणि भारतीयांच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार.
मनू भाकर, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती
रमिता जिंदाल, अर्जुन बबुता अंतिम फेरीत
रविवारी रमिता जिंदालने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. 60 शॉट्सच्या पात्रता फेरीत रमिता एकूण 631.5 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिली. रमिताने पहिल्या सिरीजमध्ये 104.3, दुसऱ्या फेरीत 106.0, तिसऱ्या फेरीत 104.9, चौथ्या फेरीत 105.3, पाचव्या फेरीत 105.3 आणि सहाव्या फेरीमध्ये 105.7 गुण मिळवले. स्पर्धेचा अंतिम सामना आज (29 जुलै) होणार आहे. भारताची आणखी एक नेमबाज एलावेनिल वलारिवन या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. परंतु तिला या स्पर्धेत दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. याशिवाय, 10 मी एअर रायफल प्रकारात अर्जुन बबुता पुरुषांच्या पात्रता स्पर्धेत सातव्या स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. अर्जुनने 630.1 गुण मिळवले. दुसरा भारतीय संदीप सिंग मात्र अंतिम फेरीसाठी पात्र ठरु शकला नाही. तो 629.3 गुणासह 12 व्या स्थानी राहिला. स्पर्धेचा अंतिम सामना 29 जुलै रोजी होणार आहे.
भारताचे पदकाचे उघडले
नेमबाजीत मनू भाकरच्या यशानंतर ऑलिम्पिक पदक मालिकेत भारत एका कांस्यपदकासह 17 व्या स्थानी आहे. सोमवारी नेमबाजीत अन्य दोघांनी अंतिम फेरी गाठली असल्याने आणखी दोन पदकांची भर पडण्याची शक्यता आहे. सध्या ऑस्ट्रेलिया तीन सुवर्णपदकासह अव्वलस्थानावर आहे.