मनू भाकर-सरबजोतचा कांस्यपदकावर निशाणा
वृत्तसंस्था/ पॅरिस
मनू भाकर व सरबजोत सिंग या नेमबाजांच्या जोडीने भारताला 10 मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदक जिंकून दिले आहे. या जोडीने दक्षिण कोरियाच्या ली ओन्हो आणि ओ ए जिन यांचा 16-10 अशा फरकाने पराभव करत कांस्यपदक पटकावले. विशेष म्हणजे, 22 वर्षीय मनू भाकरचे हे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील वैयक्तिक दुसरे पदक आहे. दोनच दिवसापूर्वी तिने महिलांच्या 10 मीटर पिस्तुल स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले होते. या ऐतिहासिक कामगिरीसह मनू ही स्वतंत्र भारताला एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके मिळवून देणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे.
10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत मुन भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीचा कांस्यपदकासाठी कोरियाच्या ओन्हो आणि ओ ये जिन यांच्या जोडीशी सामना होता. भारतीय जोडीने हा सामना 16-10 असा जिंकला. भारताने एकूण 8 राऊंड जिंकले, तर कोरियन संघाला 5 राऊंड जिंकता आले. या इव्हेंटमध्ये सर्वात आधी 16 गुण मिळवणारा संघ जिंकतो. सामन्यात भारतीय संघाने पहिला राऊंड गमावला होता. मात्र, दुसऱ्या राऊंडपासून भारतीय जोडीने सातत्याने आघाडी मिळवली. पाचवा सेट कोरियाने जिंकला मात्र इतर सर्व सेट्सवर मनू व सरबजोतचे वर्चस्व राहिले. सोमवारी भारतीय जोडीने पात्रता फेरीत 580 गुणासह तिसरे स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली होती. कोरियन संघ 579 गुणासह चौथ्या स्थानी राहिला होता. दरम्यान, या प्रकारात सर्बियाने सुवर्णपदक तर तुर्कस्थानने रौप्यपदक पटकावले.
1900 नंतर थेट 2024
मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी 1900 साली ब्रिटिश राजवटीत नॉर्मन प्रिचर्ड यांनी अॅथलेटिक्समध्ये दोन रौप्यपदके जिंकली होती. यानंतर तब्बल 124 वर्षानंतर मनूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी साकारली आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन
ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळवणाऱ्या मनू भाकर व सरबजोत सिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत अभिनंदन केले आहे. दोघांनाही शाबासकी देत भारतासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदीसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, क्रीडामंत्री मनसूख मांडविया, ऑलिम्पिक महासंघाने भारतीय जोडीचे विशेष अभिनंदन केले आहे.
पदकतालिकेत भारत 27 व्या स्थानी
आता भारत 2 कांस्य पदकांसह पदकतालिकेत 27 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची अद्याप बरेच सामने बाकी असल्याने या पदकात आणखी भर पडू शकते. पदकतालिकेत जपान 6 सुवर्णासह अव्वल स्थानावर आहे. यानंतर फ्रान्स 5 सुवर्णपदकासह दुसऱ्या स्थानावर आहे. चीन पाच सुवर्णपदकासह तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया चौथ्या, दक्षिण कोरिया पाचव्या तर अमेरिकन संघ सहाव्या स्थानी आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमधील माझी कामगिरी खरच अविस्मरणीय अशी आहे. मला खूप अभिमान वाटतोय, कारण मी ही ऐतिहासिक कामगिरी करु शकले. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. मी आणखी एका स्पर्धेत सहभागी होणार आहे, पण त्यात पदक जिंकले नाही तर कृपया माझ्यावर रागवू नका....
पदकविजेती नेमबाज, मनू भाकर
ऑलिम्पिकमधील हे पदक माझ्यासाठी अतिशय खास आहे. एकेरी प्रकारात मला अपयश आले पण दुहेरीत मात्र मला यशापर्यंत पोहोचता आले, याचा अभिमान आहे.
पदकविजेता नेमबाज, सरबजोत सिंग.
लक्ष्य हॅट्ट्रिकचे
आघाडीची नेमबाज मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास घडवला. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात या जोडीने कांस्यपदक जिंकले. या ऑलिम्पिकमधील मनू भाकरचे हे दुसरे पदक ठरले आहे. आता मनूकडे आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी असणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर अजून एका स्पर्धेत भाग घेणार आहे. मनू 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भाग घेणार असून तिला तिसरे पदक जिंकण्याची संधी आहे. ही स्पर्धा 2 ऑगस्टपासून सुरु होईल. मनूला तिसरे पदक मिळण्याची शक्यता जास्त आहे याचे कारण म्हणजे नेमबाजीतील हा तिचा सर्वात आवडता प्रकार आहे. 25 मीटर एअर पिस्तूलमध्ये मनूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 2022 साली रौप्य आणि 2023 साली सुवर्णपदक जिंकले आहे. आपल्या आवडीच्या प्रकारात मनू कोणते पदक जिंकते, याची उत्सुकता तमाम भारतीयांना असणार आहे.