लोकसाहित्यातील माणसाची जीवनशैली निसर्गसन्मुख
► प्रतिनिधी / बेळगाव
लोकसाहित्यातील स्त्रियांनी जातं या दळणाच्या माध्यमाला ईश्वर मानून आपले कवित्व जिवंत ठेवले. कारण कवितेने त्यांचे जगणे सुखद केले. मौखिक शब्दसंपत्तीकडे जात आपल्या जगण्याचे, सोसण्याचे त्यांनी चांदणे केले. आणि परिस्थितीचा बाऊ न करता जे समोर आले त्याला अनलंकृतपणे त्या सामोऱ्या गेल्या. त्यांचे साधेपणच आपल्याला स्पर्शून जाते, असे मत लोकसाहित्याच्या अभ्यासक पौर्णिमा केरकर यांनी व्यक्त केले.
मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी व हिंदवाडी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 38 व्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष या नात्याने त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मंथनच्या अध्यक्षा अपर्णा देशपांडे, सचिव संजना सामंत व अनुषा कुलकर्णी, उपाध्यक्षा लक्ष्मी तिगडी, मोनाली परब आदी उपस्थित होत्या.
लोकसाहित्य हे एका जातीचे, एका समुहाचे नाही तर एकूणच मानवी समुहाचे आहे. माणसाचे वर्तन, त्याचे स्वभाव विशेष, जीवन व्यवहाराशी निगडीत विविध प्रकारच्या वस्तू, लोककला, संगीत, विज्ञान यामध्ये आहे. मानवी जीवन व लोकसाहित्य यांना वेगळे काढता येत नाही. लोक परंपरेतील माणसांनी भाषेचा वापर जीवनातील प्रत्येक अंगाला सजविण्यासाठी केला आहे. आपले सुख-दु:ख सहज साध्या शब्दांनी गुंफण्याचे कसब त्यांनी दाखविले आहे. सण, उत्सव, रिती- रिवाज, विधी-परंपरा या साऱ्यांमधून लोकसंस्कृती विकसित पावत असते, असे त्या म्हणाल्या.
लोकसाहित्यातील माणसाची जीवनशैली निसर्गसन्मुख होती. या अनाक्षर लोकांनी समाजभान बाळगत संस्कृती प्रवाहित ठेवली, असे त्या म्हणाल्या. लोकसाहित्यातील जीवन व्यवहार अनलंकृत, सहजपणे जगण्याला भिडणारा आहे. ती लिखित कृती नाही तर मौखिक परंपरेने वर्षानुवर्षे प्रवास करत ती आपल्यापर्यंत आली आहे. त्यामुळे त्यातील जिवंतपणा आपल्याला भावतो, असे त्या म्हणाल्या.
समाज आणि साहित्य वेगळे पाडता येत नाही. ते समांतर रेषेत जात असतात. शहरी समाज शिक्षित झाला तरी लोकसाहित्यामध्ये अनुभवांचे शहाणपण आहे. जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारी लोकसाहित्यातील स्त्रियांची शब्दसंपदा थक्क करणारी आहे. हे साहित्य प्रवाही करणाऱ्या महिलांनी उघड विद्रोह केला नाही. परंतु आपल्या ओव्यांमधून आपले मन त्या अभिव्यक्त करत राहिल्या. त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये वेदना आहे, आंतरिक सल आहे, आणि जगण्याची तीव्र इच्छाही आहे.
स्त्री कोणत्याही प्रदेशातील असो तिची व्यथा आणि वेदनेच्या रेषा समांतर आहेत. भैतिकसृष्टीच्या पलीकडील जग आपल्या आकलनानुसार ही स्त्री जाणून घेते. आपल्या जीवन जाणीवांना त्यांनी शब्द दिला आणि त्यातूनच मौखिक साहित्याची निमी झाली. हे एका समुहाचे नाही तर पूर्ण मानवी समुहाचे आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रारंभी मंथनच्या सदस्यांनी ईशस्तवन सादर केले. मंथनच्या अध्यक्षा अपर्णा देशपांडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संमेलनाध्यक्षांचा परिचय प्रा. मनीषा नेसरकर यांनी करून दिला.
देवासमान नद्यांमध्येही मानवी भावभावना : राणी दुर्वे

‘नदी : रूप आणि रुपक’ या विषयावर गुंफले दुसरे सत्र
नदी ईश्वर नाही, परंतु आपण तिला ईश्वरस्वरुप मानली आहे. देवादिकांच्या आशीर्वादाने नद्या निर्माण झाल्या, अशी भावना सर्वत्र दिसते. त्यामुळे नद्यांच्या आख्यायिका अनेक आहेत. नदी नित्यनूतन रुपाने दर्शन देत राहते. सतत ओंजळीत नवीन काही तरी देत राहते. आपण माणसांनी तिला जपावं आणि तिचा सन्मान करावा, असे मत राणी दुर्वे यांनी व्यक्त केले.
मंथन साहित्य संमेलनामध्ये ‘नदी : रूप आणि रुपक’ या विषयावर दुसऱ्या सत्रात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, नदी म्हणजे वाहतं पाणी, त्यांच्याकाठी लोकवस्ती होते, संस्कृती बहरते, जीवन निर्माण होते. म्हणून देवांमध्ये ज्या मानवी भावभावना आपण पाहतो त्याच नद्यांमध्येही पाहतो. सर्व नद्यांमध्ये आपण गंगेला श्रेष्ठ मानतो. गंगेचे रूप म्हटले की एक तेजस्वी, आपल्याच तत्त्वांनी वागणारी स्त्री नजरेसमोर येते. अनेक कथांमधून वेगवेगळ्या रूपांतून गंगा आपल्यासमोर येते. आणि तिचे अस्तित्व सर्वत्र आहे. एका अर्थी भारतीय संस्कृतीचा डोलाराच गंगेच्या साक्षीने वाढला.
गंगा ही गोरी, यमुना निळी, नर्मदा कुमारी, आणि सिंधू अजाणुबाहू पुरुष अशी प्रतिमा माझ्यासमोर आहे. आज यमुनेचे रूप पाहवत नाही. त्यामुळे आपल्या मनातल्या चित्रातच तिला पाहावे असे मला वाटते. दिल्ली, आग्रापेक्षा वृंदावनला भेटणारी यमुना दिलासादायक होती. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कोयना, कावेरी या नद्यांची लोक भक्तीने पूजा करतात. कारण त्यांच्यामुळे आपलं जीवन सुफल आणि भरभराटीचे होते, ही भावना सर्वत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या मनातील नद्यांचं रूप हे स्त्री-रूप असतं. नदीची ओटी भरली जाते, तिने गावाचे रक्षण करावे, अशी त्यामागची भावना आहे. काही नद्यांना नदी, तर काही नद्यांना नद मानले जाते. त्यानुसार ब्रह्मपुत्रेसह सात नद आहेत. ते वगळल्यास बाकी सर्व नद्या स्त्री-रूपांनी समोर येतात, असे सांगून नदी जिथे आहे तिथे जीवन आहे, नदीचा प्रवाह वाहत जातो तेथे मानवी संस्कृती विकसित होते, असे त्यांनी नमूद केले.
पवृ, डोंगर, नदी आणि शंकर यांच्यामध्ये खूप साम्य आहे. डोंगर कडेकपारी, स्वयंभू शिवलिंग व आसपास नदीचे झरे आणि देवळाची मांडणी असा हा संबंध आहे, असे नमूद करत नर्मदा ही तर सर्वांची मैया म्हणजे आई आहे. नर्मदेची अनेक रूपे आहेत. सकाळी कोवळ्या उन्हात पसरलेली ती नर्मदा सुंदरी, दुपारच्या लख्ख उन्हात गवाक्षात बसलेली नर्मदा कुमारी व रात्री चंद्राच्या प्रकाशात दिसणारी जणू कविता असते, असे सांगून माणसांनी प्रत्येक नदीला जपून तिचा सन्मान करावा, असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी राणी दुर्वे यांच्या समवेत आलेल्या सुनंदा भोसेकर यांचाही सत्कार करण्यात आला.
यानंतरच्या सत्रात इचलकरंजी येथील चित्कला कुलकर्णी यांनी ‘माझा भांडी प्रपंच’ या विषयावर अभिवाचन केले. त्यांना संतोषकुमार आबाळे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन डॉ. वैशाली कुलकर्णी यांनी केले. ऐश्वर्या मुतालिक-देसाई यांनी आभार मानले. रजनी गुर्जर यांनी संपूर्ण वंदेमातरम सादर केले.