राजर्षी शाहूंच्या पदस्पर्शाने पावन ‘मनपा न्यू पॅलेस स्कूल'
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या नवीन राजवाड्यातील एका इमारतीत फार पूर्वीपासून मराठी शाळा भरवली जात होती. त्यानंतर राजवाड्यापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या एका इमारतीत शाळेचे वर्ग सुरू झाले. त्याकाळी या शाळेला न्यू पॅलेस स्कूल मराठी शाळा असे नाव देण्यात आले. कालांतराने हीं शाळा महापालिकेंतर्गत समाविष्ट करण्यात आली. जनरल रजिस्टरमधे स्वातंत्र्यपूर्व काळातील 1945 पासूनच्या नोंदी येथे आढळतात.
आजही न्यू पॅलेस परिसरातील मनपा न्यू पॅलेस स्कूल क्रमांक 15 ही शाळा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतीत दिमाखाने सुरू आहे. शाळेने स्वातंत्र्यपूर्व काळापासून रमणमळा, नाईक मळा, पुंगावकर मळा, पाटोळे मळा, माळी मळा आणि नागाळा पार्क पारिसरातील हजारो विद्यार्थी घडवले आहेत. शाळेने ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गामध्ये 120 पटसंख्या आहे. सर्वसोयीनीयुक्त, गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे मुलांचा कल वाढत आहे. बोलक्या भिंती, संगणकीय ज्ञान, सांस्कृतिक कार्यक्रम, अनुभवी शिक्षक, मोफत गणवेश, शासकीय सुविधा, शिष्यवृत्ती आदी सुविधा उपलब्ध आहेत.
खासगी व इंग्रजी शाळा वाढू लागल्याने. पालकांचाही इंग्रजी शाळेकडे कल वाढला. त्यामुळे शाळेच्या पटसंख्येवर थोडा परिणाम झाला. मात्र शिक्षकांच्या प्रयत्नांतून शाळेचे अस्तित्व टिकून राहिले. गृहभेटी, पालक मेळावे आयोजित करून जागृती निर्माण करण्यात आली. यातून शाळेची पटसंख्या वाढू लागली. शाळेत इंग्रजी, सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाचे वर्ग सुरू केले.
- संगीतमय परीपाठ
प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे वैयज्क्तक लक्ष दिले जाते. शाळेत डिजिटल साधनेही उपलब्ध आहेत. यामध्ये चार संगणक संच, तीन स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टरचा समावेश आहे, नवीन साऊंड सिस्टीम, सर्व वर्गात स्पीकर आहेत. याद्वारे संगीतमय परिपाठ घेण्यात येतो.
- बोलक्या भिंती
शाळेच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. शाळेची बाहेरून व सर्व वर्गाची आतून रंगरंगोटी करून भिंती बोलक्या केल्या आहेत. रंगरंगोटी व सीसीटीव्हीसाठी शिक्षक व लोकवर्गणीतलन निधी उपलब्ध केला आहे.
- वैशिष्ट्यापूर्ण झांजपथकाचे आकर्षण
शाळेतील पाचवी ते सातवीच्या मुलांनी झांजपथक तयार केले आहे. वैशिष्ट्यापूर्ण झांजपथकाला शहरातील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमावेळी सादरीकरणास बोलावले जाते. शाळेला मैदान उपलब्ध नसतानाही विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांत यश मिळवले आहे. शाळेत KTS, प्रज्ञाशोध परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जादा तास घेण्यात येतात. यातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. शाळेतील वंशिका पटकारे (एऊए राज्यात दुसरी), कु. धनाजी बाजारी (एऊए केंद्रात पहिला) यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश प्राप्त केले आहे.
शाळेतील उपक्रम असे : बोलक्या भिंती असणारी इमारत, इंग्रजी व भाषा समृध्दी कार्यक्रम, मोफत पाठ्यापुस्तके, इ-लर्निंग सुविधा, स्मार्ट टीव्ही प्रोजेक्टर, शैक्षणिक सहल, परिसर भेटी, मोफत गणवेश, कॉम्प्युटर शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय पोषण आहार, क्रीडा स्पर्धा, ‘अ’ श्रेणी प्राप्त मुलींना शिष्यवृत्ती, वैशिष्ट्यापूर्ण झांजपथक, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, साहित्य, अभ्यासात मागे राहिलेल्यांना विशेष मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास शिबीर, मोफत बस पास
- विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील
ऐतिहासिक वारसा लाभलेली शाळा असून तो वारसा जपण्याचा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील शिक्षक वर्ग आहे. शिक्षणासह कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी वैशिष्ट्यापूर्ण कामगिरी केली आहे. शाळेला पालक, समाज व प्रशासनाचे अधिक सहकार्य मिळणे गरजेचे आहे.
- वैशाली पाटील, प्रभारी मुख्याध्यापिका