अखेर 17 व्या दिवशी मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं , मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेतला फळांचा ज्यूस
Manoj Jarange patil : मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून सुरु असलेलं उपोषण अखेर मागे घेतलं.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा ज्यूस पिऊन हे उपोषण मागे घेण्याची घोषणा केली.अखेर 17 व्या दिवशी जरांगेनी उपोषण मागे घेतलं.यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. यावेळी मुख्यमंत्री आरक्षण मिळवून देतील असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आंतरवाली सराटी याठिकाणी मनोज जरांगे-पाटील यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली.आंदोलनासंदर्भात माहिती घेतली.आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारचा प्रयत्न करत असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी संदीपान भुमरे, राजेश टोपे, विखे पाटील ,उदय सामंत , गिरीश महाजन, दोन अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला न्याय देऊ शकतील असा विश्वास आहे. मुख्यमंत्री स्वत: इथे आले असे पहिले मुख्यमंत्री आहेत. शिंदे आम्हाला न्याय दिल्याशिवाय मागे हटणार नाहीत. आरक्षण दिल्याशिवाय मागे हटण्याची शिंदेची भूमिका आहे. हीच मराठा समाजाला खरी पोचपावती आहे.सरकारला दिलेल्या वेळेवर आम्ही ठाम राहणार.शिंदेंकडून मी आरक्षण मिळवणारच. मी शिंदेंना सराटीत आणून दाखवलंच. मराठ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा. अफवांवर विश्वास ठेवू नये.मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही.जीव गेला तर चालेल पण आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही. मराठा समाजासाठी मी पारदर्शक आहे.राजकारणासाठी मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं नको.भ्रष्टाचाराचे आरोप मी सहन करणार नाही.माझा बाप कष्ट करतो, मी समाजासाठी लढतो,असेही जरांगे यांनी सांगितले.