‘मन की बात’ला 10 वर्षे पूर्ण
पंतप्रधानांच्या निवेदनात विशेष उल्लेख : अमेरिका दौऱ्यावरही भाष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘मन की बात’च्या 114 व्या भागात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रवासाला 10 वर्षे होत असल्याची आठवण करून दिली. हा कार्यक्रम विजयादशमीच्या दिवशी सुरू झाला. आता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 10 वर्षे पूर्ण होणार आहेत. ‘मन की बात’मध्ये आपण अनेक विषयांवर भाष्य केले असून त्याच्या आठवणी मी विसरू शकत नाही. हा कार्यक्रम माझ्यासाठी मंदिरात पूजा करण्यासारखा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्याबाबत मला अनेक संदेश मिळाल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. भारताच्या प्राचीन कलाकृतींबद्दल बरीच चर्चा आहे. या भेटीत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी आपुलकी दाखवली. त्यांनी सुमारे 300 कलाकृती भारताला परत केल्या. यातील काही 4 हजार वर्षे जुन्या असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
‘मन की बात’ हा कार्यक्रम माझ्यासाठी मंदिरात जाऊन पूजा करण्यासारखा आहे. हा कार्यक्रम सध्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचला आहे. युट्युबर्सनी यावर अनेक कार्यक्रम केले आहेत. या प्रवासात सतत साथ देणारे अनेक मित्र आहेत. ‘मन की बात’मधील देशातील जनतेचे कर्तृत्व लोक लक्षपूर्वक ऐकतात. प्रत्येक भागात नवीन माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. आपल्या देशातील अनेक लोकांचे जीवन नि:स्वार्थ सेवेसाठी समर्पित आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेतल्याने मला अभिमान वाटतो, असे पंतप्रधानांनी रविवार, 29 सप्टेंबरच्या आपल्या संबोधनात स्पष्ट केले.
गांधी जयंतीला स्वच्छतेचे आवाहन
देशाच्या प्रत्येक भागात स्वच्छतेबाबत काही ना काही प्रयत्न सुरू आहेत. 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियानाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या महात्मा गांधींना हीच खरी श्र्रद्धांजली आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह आणि मित्रमंडळींसह स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
अमेरिका दौरा यशस्वी
देशवासियांना आपल्या वारशाचा अभिमान आहे. माझ्या अमेरिका भेटीदरम्यान, अमेरिकन सरकारने सुमारे 300 कलाकृती भारताला परत केल्या. यामध्ये फुलदाण्या, देवी-देवतांच्या मूर्ती, बुद्ध आणि श्रीकृष्ण यांचा समावेश आहे. जनावरांची, स्त्री-पुऊषांची टेराकोटा शिल्पेही आहेत. परत केलेल्या वस्तूंमध्ये भगवान विष्णूच्या कलाकृतींचाही समावेश आहे. यातील अनेक कलाकृती तस्करी आणि इतर मार्गाने देशाबाहेर नेण्यात आल्या. हा वस्तू आज जगातील अनेक देश आपल्या कलाकृती परत देत आहेत. अमेरिका दौऱ्यावेळीही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.