‘पुरुषी’ महिला
पुरुष हे त्यांच्या शारिरीक शक्तीसाठी ओळखायचे आणि महिला त्यांच्या नाजूकपणासाठी ओळखायच्या, असे समजायचा काळ केव्हाच मागे पडला आहे. आात महिला पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रांमध्ये काम करताना दिसतात. शरीरसौष्ठव हे असेच एक क्षेत्र आहे, की जेथे महिला पुरुषांची अनेक वर्षांपूर्वीपासून बरोबरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक महिला शरीरसौष्ठव किंवा बॉडीबिल्डिंगकरता दिवसाकाठी अनेक तास व्यायामशाळेत व्यायाम करतात. त्यांचे खाणेपिणेही त्या क्षेत्रातील पुरुषांप्रमाणेच असते. महिलांसाठी शरीरसौष्ठव स्पर्धाही होतात. पण नेदरलंड या देशातील जॅकी कॉर्न नामक महिला शरीरसौष्ठवपटूचे वैशिष्ट्या काही वेगळेच आहे. तिने या क्षेत्रात पुरुषांनाही मागे टाकेल अशी शरीरसंपदा प्राप्त केली आहे. तिचे दंड तर तिच्या वयाच्या आणि तिच्या वजनाच्या पुरुष सौष्ठवपटूंपेक्षा अधिक मोठे, स्नायूदार आणि बलवान असल्याचे दिसून येते. सध्या या महिलेची प्रसिद्धी जागतिक स्तरावर होत आहे.
ही महिला आज जगात तिच्या ‘बायसेप्स’साठी प्रसिद्ध आहे. तिचे बायसेप्स पाहून पुरुष शरीरसौष्ठवपटूही आश्चर्यचकित होतात. ही महिला प्रतिदिन अनेक तास व्यायामशाळेत व्यायाम आणि इतर शारिरीक कसरती करते. आपल्या खाण्यापिण्यासाठी ती महिन्याला तब्बल 45 हजार रुपयांचा खर्च करते. फिटनेससाठी आपण आपले सर्व जीवन समर्पित केले आहे, असे तिचे प्रतिपादन आहे. एकना एक दिवस आपण डब्ल्यूडब्ल्यूई किंवा वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटच्या मंचावर झळकणार आहोत, असा तिचा विश्वास आहे. तिची या क्षेत्रावरील निष्ठा पाहून पुरुष सौष्ठवपटूही तिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवीत आहेत. ही महिला सध्या सोशल मिडियावरही बऱ्याच प्रमाणात लोकप्रिय होताना दिसून येत आहे.