मनीष,वैष्णवी विजेते
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शनिवारी येथे झालेल्या फिनेस्टा खुल्या राष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरूषांच्या विभागात तामिळनाडूच्या मनीष सुरेश कुमारने तर महिलांच्या विभागातील एकेरीत महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जेतेपद पटकाविले.
पुरूष एकेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मनीषने किर्तीवासन सुरेशचा 6-4, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद हस्तगत केले. हा अंतिम सामना सुमारे दोन तास चालला होता. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने आकांक्षा निट्टुरेचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करत जेतेपद पटकाविले. या स्पर्धेत नितिन कुमार सिन्हा आणि मान केशरवाणी या जोडीने पुरूष दुहेरीचे जेतेपद मिळविताना मनीष सुरेश कुमार व अभिनव संजीव यांचा 6-4, 3-6, (10-50) असा पराभव केला. महिला दुहेरीचे जेतेपद आकांक्षा निट्टुरे आणि सोहा सादीक यांनी पटकाविताना अंतिम सामन्यात पूजा इंगळे व युब्रायनी बॅनर्जी यांचा 6-2, 6-2 असा फडशा पाडला. मुलींच्या 18 वर्षांखालील वयोगटातील दुहेरीचे जेतेपद सविता भुवनेश्वरन आणि अहान यांनी पटकाविताना अंतिम सामन्यात आकांक्षा घोष व दीपशिखा यांचा 6-3, 6-3 असा फडशा पाडला.