मनीष सिसोदिया यांना पुन्हा झटका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या मद्यधोरण घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा झटका दिला आहे. त्यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे गेली असून आता ती 5 ऑगस्टला होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीत सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी त्यांना ईडीकडूनही अटक करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यांनी कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका सादर करुन जामीन मिळविण्याचा केलेला प्रयत्न अद्यापपावेतो असफल ठरलेला आहे. नुकतीच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी याचिका सादर केली आहे.
सोमवारी होती सुनावणी
त्यांच्या नव्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी करण्यात येणार होती. तथापि, ती 5 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 1 ऑगस्टपर्यंत त्यांच्या याचिकेवर प्रत्युत्तर देण्याचा आदेश सीबीआयला देण्यात आला आहे. त्यामुळे त्वरित सुनावणी होईल, ही सिसोदिया यांची अपेक्षा फोल ठरली आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही संस्थांकडून दोषारोपपत्र सादर केले जाणार आहे.