मनीष-कीर्तिवासन अंतिम फेरीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फिनेस्टा खुल्या राष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरूष एकेरीच्या जेतेपदासाठी मनीष सुरेशकुमार आणि कीर्तिवासन सुरेश यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल तर वैष्णवी आडकर आणि आकांक्षा निट्टुरे यांच्यात महिला एकेरीत अजिंक्यपदासाठी लढत होईल.
पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तामिळनाडूच्या मनीषने पश्चिम बंगालच्या इशाक इक्बालचा 1-6, 6-1, 6-1 तर दुसऱ्या चुरशीच्या उपांत्य लढतीत कीर्तिवासन सुरेशने मद्विन कामतचा 7-6 (7-3), 3-6, 6-4 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. ही लढत चार तास चालली होती. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या टॉपसिडेड वैष्णवीने कर्नाटकाच्या चौथ्या मानांकीत सोहा सादीकचा 6-1, 6-0 असा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱ्या उपांत्य लढतीत द्वितीय मानांकीत आकांक्षा निट्टुरेने मणीपूरच्या जेनीफरचा 3-6, 6-2, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
18 वर्षांखालील महिलांच्या विभागात कर्नाटकाच्या सातव्या मानांकीत स्निग्धा कांताने आपल्याच राज्यातील श्रीनिती चौधरीचा 7-6, 6-0 तसेच मुलांच्या विभागात हरियाणाच्या चौथ्या मानांकीत टी.पावाने कर्नाटकाच्या गंधर्व गौरवचा 6-2, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.