For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूर हिंसाचार हे पन्नूचे कारस्थान

06:49 AM Feb 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
मणिपूर हिंसाचार हे पन्नूचे कारस्थान
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

अमेरिकेत वास्तव्यास असलेला शीख दहशतवादी आणि ‘शीख फॉर जस्टीस’ या संघटनेचा म्होरक्या गुरुपतवंतसिंग पन्नू यानेच मणिपूर हिंसाचाराचे कारस्थान रचले आहे, असा धक्कादायक गौप्यस्फोट भारताया सुरक्षा प्राधिकरणांच्या एका संदेशात करण्यात आला आहे. पन्नू याच्या संघटनेकडून मणिपूरमधील फुटीरतावादी ख्रिश्चन संघटनांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे या संदेशात स्पष्ट केले गेले आहे. शीख फॉर जस्टीस या संघटनेवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

भारताच्या गुप्तचर संस्थांनी हा नोंदवृत्तांत केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर केला आहे. पन्नू याची संघटना अनेक महिन्यांपासून मणिपूरमधील फुटीरतावादी संघटनांशी संपर्कात असून या राज्यात हिंसाचार भडकविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. केंद्रीय गृहविभागाने या वृत्तांताची गंभीर दखल घेतली असून तिचा समावेश आपल्या महत्वपूर्ण अहवालात केला आहे. भारतात अस्थैर्य निर्माण व्हावे, यासाठी पन्नू कार्यरत आहे, ही माहिती भारताला पूर्वीपासूनच होती. तथापि, आता पन्नूची पाळेमुळे पंजाब प्रमाणे इतरही राज्यांमध्ये पसरल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

संघटनेची धोकादायक कारस्थाने

पन्नू याची संघटना आता मणिपूरच्या ख्रिश्चन फुटीरतावादी संघटनांना भारतापासून मणिपूर अलग करण्यासाठी भडकावित आहे. या कारस्थानाची माहिती काही महिन्यांपूर्वी भारताच्या गुप्तचर संस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी मुळापर्यंत जाऊन माहिती काढली. या माहितीतून या कारस्थानाची तीव्रता आणि व्यापकता गुप्तचरांना समजून आली. त्यामुळे त्यांनी त्वरित केंद्र सरकारच्या गृहविभागाला सावध केले असून महत्वाची माहिती पुरविली आहे. 2023 पासूनच मणिपूर धार्मिक संघर्षात होरपळून निघत आहे. गुप्तचरांनी गृहविभागाला दिलेल्या माहितीत अमेरिकेतील पन्नूच्या निवासस्थानाच्या पत्त्याचाही समावेश आहे. भारत सरकार आता ही बाब अमेरिकेच्या प्रशासनाच्या दृष्टीला आणून देण्याची शक्यता आहे.

शीख सैनिकांनाही भडकाविण्याचा प्रयत्न

गुरुपतवंतसिंग पन्नू याने आपल्या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून भारताच्या सैन्यदलांमधील शीख सैनिकांनाही भडकाविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. शीख सैनिकांनी भारतीय सेनेतून बाहेर पडावे, यासाठी तो प्रयत्न करीत आहे. शीख सैनिकांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून सैनिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न त्याची संघटना करु शकते, असेही काही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारताने या संघटनेवर आणि पन्नूवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
Tags :

.