For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूर : ईशान्येची दुखरी नस

06:24 AM Sep 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
मणिपूर   ईशान्येची दुखरी नस
Advertisement

साधारणत: दोन वर्षांपूर्वी भारताच्या ईशान्येला असणाऱ्या मणिपूर या छोट्या राज्यात हिंसाचार उफाळल्याने ते पुन्हा प्रकाशात आले आहे. या राज्यातील दोन महत्वाचे समाजगट, मैतेयी आणि कुकी यांच्यातील हा संघर्ष आहे. 200 हून अधिक लोकांचे बळी घेणाऱ्या या संघर्षाच्या निमित्ताने राजकारणही पुष्कळ करण्यात आले. या संघर्षासाठी विद्यमान केंद्र सरकारला उत्तरदायी मानण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका-टिप्पणीही करण्यात आली. तथापि, वस्तुस्थिती ही आहे, की हा संघर्ष आज उफाळलेला नाही. त्याला सहा दशकांचा इतिहास आहे. तो समजून घेतल्याशिवाय त्याचे स्वरुप, कारणे अन् त्यावरील उपाय यांचा विचार करता येणे अशक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा संघर्ष नव्याने उफाळल्यापासून प्रथमच शनिवारी या राज्याचा दौरा केला. त्या निमित्ताने या राज्याची जडणघडण, तेथील विविध समाजघट, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि हिंसाचाराची पार्श्वभूमी, शेजारील राष्ट्रांचा हस्तक्षेप, तसेच आजवर करण्यात आलेल्या उपाययोजना, त्यांचे यशापयश आणि या ‘सात भगिनीं’मधील एक असलेल्या या राज्याचा भविष्यकाळ यांच्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न...

Advertisement

भौगोलिक आणि सामाजिक स्थिती

ड मणिपूर हे भारताच्या ईशान्य टोकाला असलेले, म्यानमार या देशाला लागून असलेले आणि निसर्गसौंदर्याने नटलेले असे अवघ्या 40 लाख लोकसंख्येचे राज्य आहे. ते सहा दशकांपूर्वी बृहत् आसाम राज्याचा भाग होते. तथापि, नंतर त्याला स्वतंत्र राज्याची ओळख देण्यात आली आहे. अल्प लोकसंख्या असली तरी येथे किमान 40 वांशिक गट आहेत. त्यांची प्रामुख्याने मैतेयी, कुकी आणि इतर अशी स्थूलमानाने विभागणी केली जाते. या समाजघटकांचे एकमेकांशी संबंध क्वचितच सलोख्याचे राहिलेले आहे. सशस्त्र संघर्ष हा जणू या राज्याचा स्थायीभाव आहे.

Advertisement

ड मणिपूरमधल्या या संघर्षाला फुटीरतावादाची जोड असल्याने तो अधिक गंभीर आहे. या राज्याचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. सखल प्रदेश, जेथे मैतेयी समाज आणि या समाजातील विविध उपगट यांचे वास्तव्य प्रामुख्याने आहे. तर या सखल प्रदेशाच्या अवतीभोवती असणारा डोंगराळ प्रदेश, जेथे कुकी आणि इतर वन्य जमाती यांचे वास्तव्य आहे. मैतेयींची संख्या अधिक असली, तरी त्यांच्या प्रभावाखालचा प्रदेश क्षेत्रफळाने कमी आहे. तर कुकी आणि इतर वन्य जमातींची संख्या कमी असली तरी, त्यांच्या वास्तव्याचा प्रदेश आकाराने बराच मोठा आहे.

ड भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा हे राज्य भारताचा भाग नव्हते. 1947 मध्ये मणिपूर करार अस्तित्वात आला आणि 1949 मध्ये हा प्रदेश भारताचा भाग बनला. त्याचा समावेश आसाम राज्यात करण्यात आला. भारतातला हा समावेश त्यावेळेपासूनच येथील अनेक समाजघटकांना मान्य नव्हता. त्यामुळे 1950 पासूनच या प्रदेश फुटीरतावादाने ग्रासलेला आहे. काही जमातींची भूमिका स्वतंत्र राष्ट्र म्हणून हा प्रदेश ओळखला जावा, अशी होती. त्यामुळे प्रारंभीच्या काळापासूनच भारत सरकारशी सशस्त्र संघर्ष या जमातींकडून वारंवार केला गेला आहे.

स्वतंत्र राज्यासाठी हिंसाचार...

ड प्रारंभी मणिपूरचे प्रशासकीय व्यवस्थापन केंद्र सरकार नियुक्त मुख्य विभागीय आयुक्तांकडून केले जात होते. याला विरोध असणाऱ्या जमातींनी उग्र आंदोलन केले. हत्या, जाळपोळ आणि हरताळ यांनी हे आंदोलन गाजले. त्यानंतर या प्रदेशाला वेगळे राज्य म्हणून स्थान देण्याच्या हालचालींना प्रारंभ करण्यात आला.

ड मणिपूरप्रमाणेच त्या काळात नागालँड आणि मिझोराममध्येही फुटीरतावादाला ऊत आला होता. पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगला देश) आणि चीन या सीमावर्ती देशांनी या फुटीरतावादाला पैशाचे आणि शस्त्रांचे पाठबळ पुरविले. हे भाग भारतापासून तोडण्याचा या देशांनी शक्य तितका प्रयत्न चालविला होता.

ड हा परकीय हस्तक्षेप थांबविण्यासाठी आणि अनेक समाजघटकांमधील फुटीरतेची भावना सौम्य करण्यासाठी मोठ्या आसाम राज्याचे विविध राज्यांमध्ये तुकडे करण्याचा निर्णय याच काळात घेण्यात आला होता. त्यामुळे मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम आदी छोट्या वेगळ्या राज्यांची निर्मिती झाली.

इंदिरा गांधी यांची भेट

ड 23 ऑक्टोबर 1969 या दिवशी तत्कालीन नेत्या इंदिरा गांधी यांनी मणिपूरला भेट दिली होती. त्यांचे जाहीर सभेत भाषण होत असताना त्यांच्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली. तसेच सभास्थानी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. पोलिसांची वाहने आणि रुग्णवाहिका पेटविण्यात आल्या. जमावाने एका पोलिस वाहनचालकाची हत्या केली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सरकारी आकड्यांच्या अनुसार चार नागरीकांचा बळी गेला. त्यामुळे आंदोलन अधिकच भडकले. पुढच्या दोन वर्षांमध्ये हिंसाचार संपूर्ण राज्यात वेगाने पसरला होता.

ड विविध फुटीरतावादी समाजगटांनी ‘युनायटेड अॅक्शन कमिटी’ नामक गट स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी स्थापन केला होता. या गटाच्या वतीने मैतेयींच्या स्वतंत्र राज्याची स्थापना झाल्याचे 1970 मध्ये घोषित करण्यात आले होते. मैतेयी राज्याचे स्वयंघोषित अध्यक्ष डब्ल्यू. एस. तोंबा यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आणि अभियोगाच्या अंतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा झाली.

ड नागालँडमध्ये स्वतंत्र राज्यासाठी 60 च्या दशकात मोठे आंदोलन झाले होते आणि त्यात प्रचंड हिंसाचार झाला होता. त्यामुळे 1963 मध्येच नागालँडला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला होता. यामुळे मणिपूरच्या स्वतंत्र राज्य समर्थकांना अधिकच बळ मिळाले आणि त्यांनी नागालँडच्या धर्तीवर अधिकच उग्र आंदोलनाची योजना केली. त्यामुळे या प्रदेशात प्रशासन चालविणे अशक्यप्राय झाले होते.

धार्मिक संघर्षाचीही पार्श्वभूमी

ड मणिपूरमधला हिंसक संघर्ष केवळ वांशिक किंवा फुटीरतावादासाठी नाही. त्याला धर्माचीही पार्श्वभूमी आहे. मैतेयी समाज आणि या समाजातील विविध घटक प्रामुख्याने हिंदूधर्मिय आहेत. तर कुकी समाज आणि अन्य काही वन्य जमाती प्रामुख्याने ख्रिश्चन आहेत. ब्रिटीशांच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये या प्रदेशात मिशनरी संस्थांना मुक्तद्वार दिले गेल्याने अनेक वन्य जमातींचे धर्मांतर झाले आहे. त्यामुळे मणिपूरमधील संघर्षाचा विचार या धार्मिक अंगानेही करावा लागतो. तथापि, फुटीरतावादाची धग धार्मिक संघर्षापेक्षा अधिक तीव्र आहे, असे मत काही अभ्यासकांकडून व्यक्त केले गेले आहे.

‘नागा’चा ज्वलंत मुद्दा

ड मणिपूरसह संपूर्ण ईशान्य भारतात प्राचीन ‘नागा’ किंवा ‘नाग’ जमात आणि या जमातीमधील उपजमाती यांची संख्या मोठी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने हा समुदाय सर्वात मोठा आहे. तथापि, तो विविध जमातींमध्ये विभागला गेला आहे. ‘नाग’ समुदायाच्या किमान 25 ते 30 उपजमाती अस्तित्वात आहेत. या ‘नाग’ फॅक्टरचाही महत्वाचा सहभाग मणिपूरसह ईशान्येतील फुटीरतावाद आणि हिंसक संघर्षात असल्याचे आजवर अनेकदा पहावयास मिळाले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मणिपूरमधील आनल, मोयोन, मोनसँग आणि मारींग या कुकी संस्कृतीशी जवळीक असलेल्या जमातींनी स्वत:ला ‘नाग’ समुदायाच्या जमाती मानण्यास प्रारंभ केल्याने या समुदायाचा या प्रदेशातील घडामोडींमध्ये सहभाग वाढला आहे. परिणामी, हा जमातीसमूहही या भागात महत्वाचा ठरत आहे.

फुटीरतेप्रमाणे अंतर्गत संघर्षही...

ड मणिपूरमधील संघर्षाचे भारतातून फुटून निघण्यासाठीचा संघर्ष आणि विविध जमातींमधील अंतर्गत वर्चस्वासाठीचा संघर्ष, असे दोन भाग आहेत. सध्या भारतातून फुटून निघण्यासाठीच्या संघर्षाची तीव्रता कमी झालेली आहे. याला कारण विविध केंद्र सरकारांनी आतापर्यंत फुटीरतावादी गटांचा केलेला बंदोबस्त आणि त्याचसमवेत या गटांशी केलेले विविध शांतता करार, हे आहे. तथापि, अंतर्गत संघर्षाची आग अद्यापही धुमसत आहे. गेल्या चाळीस वर्षांमध्ये उद्भवलेले संघर्ष प्रामुख्याने दोन जमातीसमूंहांमधील आहेत, असे दिसून येत आहे.

80 च्या दशकात सर्वाधिक हिंसाचार

ड मणिपूरसह संपूर्ण ईशान्य भारतात आतापर्यंतचा सर्वाधिक हिंसाचार 1980 च्या दशकात झाला, अशी माहिती मिळते. या दशकात मणिपूरमध्ये ‘कुकी नॅशनल फ्रंट’ आणि ‘कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन’ या दोन संघटना अस्तित्वात आल्या. कुकी नॅशनल ऑर्गनायझेशनची सशस्त्र शाखा म्हणून कुकी नॅशनल आर्मी ही संघटना कार्यरत झाली, या संघटनेने म्यानमार देशातील फुटीरतावाद्यांकडून शस्त्रे आणि प्रशिक्षण मिळविले आणि मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला.

ड या संघटनेच्या, तसेच इतर काही छोट्या संघटनांच्या फुटीरवादामुळे आणि हिंसेमुळे 1980 आणि त्यानंतरच्या काळात या राज्यात ‘आफ्स्पा’ कायदा लागू करण्यात आला. या आर्मड् फोर्सेस (स्पेशल पॉवर) अॅक्टमुळे सुरक्षा दलांना अधिक अधिकार मिळाले. या अधिकारांच्या जोरावर फुटीरवादी संघटना आणि त्यांच्या सशस्त्र शाखा यांच्या कारवायांवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. त्यामुळे हा कायदा  मागे घ्यावा, अशी मागणी गेल्या 30 वर्षांपासून फुटीरतावादी करत आहेत.

महत्वाच्या अतिरेकी संघटना किंवा गट

ड मैतेयी समाज : युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट, पीपल्स लिबरेशन पार्टी ऑफ मणिपूर, पीपल्स रिव्हॉल्युशनरी पार्टी ऑफ कांगलेपाक, कांगलेपाक कम्युनिस्ट पार्टी, कांगलेई यावोल कान्ना लुप आणि अन्य 5 संघटना या समुदायाच्या आहेत.

ड कुकी समाज : कुकी नॅशनल फ्रंट मिलीटरी कौन्सिल, कुकी नॅशनल आर्मी, कुकी लिबरेशन आर्मी ऑफ मणिपूर, कुकी नॅशनल फ्रंट ऑफ कुकीलँड या महत्वाच्या संघटना असून आणखी किमान 16 संघटना या समुदायाच्या आहेत.

ड नागा आणि झोमी : या समुदायांच्याही संघटना असून त्यांची संख्या 4 ते 6 असल्याची माहिती दिली जाते. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड ही नाग लोकांची संघटना मणिपूरमध्येही काही प्रमाणात कार्यरत असल्याचे दिसते.

निष्कर्ष

ड साधारणत: 1960 पासूनच मणिपूरमध्ये फुटीरतावाद, सशस्त्र उठाव, देशविरोधी कारवाया, हिंसाचार, हत्या आणि दंगली होत आल्या आहेत. हा प्रदेश फारसा शांत कधीच नव्हता. या प्रदेशाचा भारतातील समावेश हे संघर्षाचे प्रमुख कारण पूर्वी होते. आता हे कारण मागे पडत चालले आहे. कारण, भारतापासून आपण वेगळे होऊ शकत नाही, ही जाणीव निर्माण झाली आहे. मात्र, विविध गटांमधील वांशिक भेद, त्यातून निर्माण होणारा हिंसाचार आणि स्वतंत्र कुकी राज्याची मागणी आदी मुद्द्यांवर अलिकडच्या काळात प्रामुख्याने संघर्ष होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यातही याचे प्रत्यंतर आले असून हे राज्य पूर्णांशाने शांततेच्या मार्गावर येण्यास मोठा कालावधी लागणार आहे.

  • -  अजित दाते

Advertisement
Tags :

.