मणिपूर भाजप अध्यक्षांची शहांशी चर्चा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मणिपूरमधील परिस्थितीसंबंधी चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मणिपूर राज्य शाखेच्या अध्यक्षा ए. शारदा देवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. त्या गुरुवारी यासाठी दिल्लीत आल्या होत्या. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीची माहिती त्यांनी शहा यांना दिली. गेले दीड वर्षभर या राज्यातील दोन जमातींमध्ये प्रचंड संघर्ष होत आहे. मैतेयी आणि कुकी समाजांमध्ये अनेकदा दंगली आणि हिंसाचार झाला असून काही जणांचा मृत्यूही झाला आहे.
राज्यातील परिस्थिती अद्याप म्हणावी तशी सुधारली असून केंद्र सरकारने त्वरेने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मैतेयी आणि कुकी समाजांमध्ये अद्यापही विश्वासाचे वातावरण निर्माण झालेले नाही. राज्यांतर्गत स्थलांतरितांचा प्रश्न सोडविण्यासाठीही त्वरेने हालचाली करण्याची आवश्यकता आहे. येथील लोक केंद्र सरकारने परिस्थिती सुधारण्याठी पुढाकार घ्यावा या मताचे आहेत. राज्यातील लोकांच्या भावना आणि अपेक्षा मी अमित शहांकडे व्यक्त केल्या. शहा यांनी केंद्राच्या संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले, असे देवी यांनी नंतर स्पष्ट केले.
गंभीरपणे लक्ष
केंद्राचे मणिपूरकडे पूर्ण लक्ष असून तेथील परिस्थितीची माहिती वेळोवेळी आम्ही घेत आहोत. तेथील लोकांच्या समस्या आणि दोन महत्वाच्या समाजांमध्ये उद्भवलेला संघर्ष या विषयी केंद्र सरकार पूर्ण गांभीर्याने कारवाई करत आहे. गेल्या दीड वर्षांमधील संघर्षात 200 हून अधिक नागरीकांचा बळी पडला आहे. हजारो लोकांनी राज्यातल्या राज्यात स्थलांतर केले आहे. स्थलांतर करणाऱ्यांमध्ये कुकी आणि मैतेयी या दोन्ही समाजांचे नागरीक आहेत. केंद्र सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले.