Manikrao Kokate यांचा रमीचा डाव! बचावले खरे पण जनतेत हसे झाले, सरकारचे नाक कापले
कोकाटे कृषीमंत्रिपदाचा पत्ता डिस्कार्ड करून मंत्रिमंडळात टिकले खरे! पण...
By : शिवराज काटकर
सांगली : रमीच्या खेळात सिक्वेन्स (सांगड) आणि सेट (गट) यांना खूप महत्त्व असते. या खेळात जोकर ‘गॉडफादर’ असतो! 14 वा पत्ता डिस्कार्ड करून सिक्वेन्स आणि सेट जो दाखवू शकतो तो डाव जिंकतो. विधिमंडळात रमी खेळाने अडचणीत आलेले माणिकराव कोकाटे कृषीमंत्रिपदाचा पत्ता डिस्कार्ड करून मंत्रिमंडळात टिकले खरे! पण, रमीत किमान एक प्युअर सिक्वेन्स नसेल तर तो डाव शुद्ध फसलेला म्हणजेच इनव्हॅलिड ठरतो. कोकाटे बचावले खरे पण, जनतेत हसे होऊन सरकारचे नाक कापले गेले.
महाराष्ट्राच्या राजकारणात नाशिक जिह्यातील सिन्नरचे माणिकराव कोकाटे यांचा प्रवास हा जणू रमीच्या खेळातील एक कुशल खेळाडूचा डाव आहे. प्रत्येक वेळी पत्ते बदलले, पक्ष बदलले, पण रमीमधील सिक्वेन्स आणि सेट पूर्ण करत डाव साधण्याची कला त्यांनी कायम राखली.
अर्थात या सत्तेच्या खेळातील पत्ते टाकताना त्यांना राज्याच्या राजकारणातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या प्रमुख चारही पक्षांचा सेट उपयोगात आला. ते पाचवेळा आमदार झाले. एकदाच पराभूत झाले. यंदाच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचा सिक्वेन्स लागायला नको म्हणून कोणत्यातरी अदृश्य हाताने माणिकराव या तिसऱ्या ओबीसी पत्त्याची सांगड (सिक्वेन्स) साधली.
जोकरचा गॉडफादर सारखा उपयोग केला. सत्तेतील प्रमुखांना नको असलेला एक, एक पत्ता डिस्कार्ड करत माणिकरावांनी आतापर्यंतची रमी साधली. खुर्ची वाचवली. कृषीमंत्रिपद गेल्याची नामुष्की यायचा हा काळ. पण संधी मिळाल्याने जगज्जेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचा सत्कार आणि तीन कोटींचा धनादेश प्रदान करण्याचे क्रीडा मंत्री म्हणून भाग्य माणिकरावांना आपसूक लाभले.
सत्ते पे सत्ता आणि पत्ते पे पत्ता म्हणतात ते यालाच! नाशिकच्या सिन्नर मतदारसंघातून पाच वेळा आमदार होण्याच्या विक्रमासाठी, हरेक पक्षाच्या झेंड्याखालील लढाई, त्यांच्या संधी साधूपणाची साक्ष देते. हा चातुर्याचा नाही, तर वादग्रस्त वक्तव्ये, कायदेशीर प्रकरणे आणि तरीही मंत्रिपदाची खुर्ची टिकवण्याचा चमत्कार आहे.
कोकाटे यांचा राजकीय प्रवास 1995 मध्ये काँग्रेसमधून सुरू झाला. 1999 मध्ये ते पवारांसोबत राष्ट्रवादीत आले. पण, तिकीट मिळणार नाही म्हणून सिन्नरमधून पहिल्यांदा शिवसेनेतून आमदार झाले. 2004 मध्ये, शिवसेनेतून निवडणूक जिंकून नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेले. 2009 मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले.
2014 मध्ये मात्र त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला, पण शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांनी त्यांना 20 हजार मतांनी पराभूत केले. 2009 च्या निवडणुकीत अवघ्या दोन हजार मताने निवडून आल्याने पुढची निवडणूक त्यांना सोपी नव्हतीच. 2014 चा पराभव माणिकरावांसाठी रमीच्या डावात पत्ते नीट न लागण्यासारखा होता. ते पत्ते पुन्हा अजितदादांच्या मदतीनेच लागले.
2019 मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्यापूर्वी पहाटेच्या शपथविधीला ते हजर होते. मात्र अजितदादांचे बंड फसते आहे हे लक्षात आल्यावर पलटी मारली आणि ट्विट केला की, दादा नेते असल्याने त्यांच्या बोलावण्यावरून गेलो. तेथे शपथविधी होईल याची कल्पनाच नव्हती. आपण पक्षासोबतच आहोत. पण, हा शब्द त्यांनी कधीही राखला नाही.
नेहमीच दादांच्या बंडात पहिल्यांदा पक्ष सोडणाऱ्यांपैकी त्यांचे नाव निश्चित मानले गेले. 2024 मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) तिकिटावर त्यांनी पुन्हा विजय मिळवला. विशेषत: 2024 मध्ये अजित पवारांनी सिन्नरच्या सभेत ‘माणिकरावांना आमदार करा, मी त्यांना मंत्री करतो‘ असे आश्वासन दिले, आणि खरोखरच माणिकरावांना कृषिमंत्रिपद मिळाले.
वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास त्यांच्या राजकीय कारकिर्दीइतकाच रंगीत आहे. 2025 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांची तुलना ‘भिकाऱ्यांशी‘ केली, ज्यामुळे शेतकरी संघटना आणि विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यांनी एका सभेत ‘कितीही जवळचा असला तरी चुकला की मोक्का लावायला सांगेन‘ असे कार्यकर्त्यांना उद्देशून वक्तव्य केले, जे विरोधकांनी हास्यास्पद ठरवले.
मुलीचा विवाह नोंदणी पद्धतीने करणार असे सांगून राज्यभर वाहवा मिळवणाऱ्या माणिकरावांनी प्रत्यक्षात नोंदणी झाल्यानंतर स्वागत समारंभावर जो खर्च केला तो शाही समारंभाला लाजवेल इतका प्रचंड होता. यंदाच्या पावसाळी अधिवेशनावेळी ते विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.
आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत माणिकरावांवर टीका केली. विरोधकांनी आणि शेतकरी संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. माणिकरावांनी त्यावर ‘मी सॉलिटेयर खेळत होतो, कोणीतरी तो गेम डाउनलोड केला होता, असा अकल्पित खुलासा केला, जो हास्यास्पद ठरला.
अजित पवारांनी ‘मी चुकीचं समर्थन करत नाही, पण तीनवेळा समजावून सांगतो, चौथ्यांदा नाही‘ असे म्हटले. प्रत्यक्षात, माणिकरावांना चौथ्यांदा देखील अभय मिळाले. कोकाटे यांचा राजकीय प्रवास हा रमीच्या खेळासारखा आहे, जिथे पत्ते बदलतात, पण जोकर नेहमीच त्यांच्या हातात येतो.
पक्ष बदल, वादग्रस्त वक्तव्ये, कायदेशीर प्रकरणे, आणि तरीही मंत्रिपद टिकवणे, हे सगळं त्यांच्या राजकीय चातुर्याचं प्रतीक आहे. पण प्रश्न असा आहे की, हा जोकराचा खेळ किती काळ चालेल? कदाचित पुढच्या निवडणुकीत त्यांचे पत्ते पुन्हा एकदा गडबडतील, आणि जोकरही त्यांना वाचवू शकणार नाही. पण, तोपर्यंत, माणिकरावांचा रमीचा खेळ सुरूच राहणार.
वादाचा खेळ, जोकराचा मेळ! माणिकरावांच्या राजकीय डावात सर्वात मोठा वाद 1995 च्या फ्लॅट घोटाळ्याचा आहे. नाशिकमधील मुख्यमंत्र्यांच्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत कोट्यातून त्यांनी आणि त्यांच्या भावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन फ्लॅट मिळवले. याप्रकरणी 1997 मध्ये त्यांच्यावर आणि त्यांच्या भावावर गुन्हा दाखल झाला.
यात कोपरगावच्या साखर कारखान्याचे संचालक असणाऱ्या शेतकरी वडिलांचे पुत्र माणिकरावांनी स्वत:ला गरीब दाखवले. तब्बल 28 वर्षांनंतर नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. पण लगेचच त्यांनी त्या शिक्षेला स्थगिती मिळवली.
यामुळे पुन्हा निवडणूक घेण्यासाठीचा देशाचा खर्च टाळला जाईल, असे चक्क न्यायालयाने म्हटले. जणू माणिकरावांना रमीच्या डावात पुन्हा एकदा ‘जोकर‘ मिळाले. या प्रकरणात कारवाई टाळली गेली, आणि माणिकरावांचा डाव साधला गेला. माणिकराव मूळचे वकील आहेत. इथे त्यांची वकिली कामी आली.