मनिका बात्राची ऐतिहासिक कामगिरी
बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागचा जलवा कायम : तिरंदाजीत भजन कौर उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची अव्वल टेबल टेनिसपटू मनिका बात्राने ऐतिहासिक कामगिरी साकारली आहे. ऑलिम्पिकमध्ये राऊंड 16 मध्ये स्थान मिळवणारी मनिका ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिस खेळाडू आहे. यापूर्वी टेबल टेनिसमध्ये कोणताही भारतीय खेळाडू राउंड ऑफ 32 च्या पुढे जाऊ शकला नव्हता. मनिकाने हा रेकॉर्ड मोडला आहे. याशिवाय, बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक-चिराग जोडीने आपला जलवा कायम राखत क गटात अव्वलस्थान मिळवले.
सोमवारी रात्री उशीरा राउंड ऑफ 32 मध्ये मनिकाचा सामना फ्रान्सची भारतीय वंशाची खेळाडू पृथिका पवाड हिच्याशी झाला. या सामन्यात मनिकाने पृथिकाचा 11-9, 11-6, 11-9, 11-7 असा पराभव केला. दरम्यान, पहिल्या गेममध्ये मनिका 2 गुणांनी मागे होती. मात्र तिने शानदार कमबॅक करत हा गेम 11-9 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मनिकाने सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करत 11-6 ने आरामात विजय मिळवला. तिसऱ्या गेममध्ये पृथिकाने थोडाफार संघर्ष केला, मात्र मनिकाने हा गेम 11-9 ने आपल्या नावे केला. चौथा गेमही तिने 11-7 असा सहज जिंकत फ्रान्सच्या युवा खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला.
मनिकाने मोडला शरथ कमलचा विक्रम
ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही भारतीय महिला टेबल टेनिसपटूने 32 राउंडच्या पुढे प्रगती केली नव्हती. मनिकानेही हा विक्रम मोडला. शरथ कमलने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत 32 ची फेरी गाठली होती. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत मनिकाने शरथ कमल यांचा विक्रम मोडला. आता राउंड ऑफ 16 मध्ये मनिकाचा सामना जपानची हिरोनो मियू आणि हाँगकाँगची झू चेंगझू यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
सात्विक-चिरागचा धमाकेदार विजय
चिराग शेट्टी आणि सात्विक यांनी अल्फियान फझार आणि एर्दियान्तो मोहम्मद रायन या इंडोनेशियन जोडीचा 21-13, 21-13 असा पराभव केला. या विजयासह भारतीय जोडीने आपल्या गटात अव्वलस्थान मिळवले आहे. 40 मिनिटे चाललेल्या या सामन्यात चिराग व सात्विकने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. पहिल्या गेमपासून आक्रमक खेळताना भारतीय जोडीने प्रतिस्पर्धी इंडोनेशियन जोडीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही.
तिरंदाज भजन कौर उपांत्यपूर्व फेरीत
भारतीय तिरंदाज भजन कौरने महिलांच्या तिरंदाजीच्या वैयक्तिक गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना 3 ऑगस्टला होणार आहे. भजनने फेरीच्या 16 मध्ये पोलंडच्या व्हायोलेटा मिशोरचा 6-0 असा पराभव केला. भजनने 28-23, 29-26 आणि 28-22 असे सलग तीन सेट जिंकले. दुसरीकडे, भारताच्या अंकिता भगतला मात्र एकेरीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.
बॉक्सिंगमध्ये स्टार बॉक्सर अमित पराभूत
51 किलो गटात झालेल्या लढतीत झांबियाच्या पॅट्रिक चिन्याबाने अमित पंघालचा 4-1 असा पराभव केला. पॅट्रिकने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना अमितला जराही वरचढ होऊ दिले नाही. या पराभवासह अमितचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.