मनिका बात्रा उपउपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ केसी (सौदी अरेबिया)
येथे सुरू असलेल्या सौदी स्मॅश आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मनिका बात्राने चीनच्या द्वितीय मानांकीत वांग मनयूला पराभवाचा धक्का देत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले.
महिला एकेरीच्या सामन्यात 39 व्या मानांकीत मनिका बात्राने द्वितीय मानांकीत वांग मनयूचा 6-11, 11-5, 11-7, 12-10 अशा गेम्समध्ये केवळ 37 मिनिटात पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. चीनच्या वांग मनयूने टोकीओ ऑलिंपिक स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्णपदक तसेच 2021 साली तिने विश्व विजेतेपद मिळविले होते.
मिश्र दुहेरीत भारताच्या हरमित देसाई आणि यशस्वीनी घोरपडे यांनी स्पेनच्या पाचव्या मानांकीत अलव्हॉरो रोबेल्स आणि मारिका झिओ यांचा 3-2 अशा गेम्समध्ये (11-5, 5-11, 3-11, 11-7, 11-7) पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत अन्य एकेरी सामन्यात भारताच्या शरथ कमल, अर्चना कामत, मानव ठक्कर व सुतिर्था मुखर्जी यांना मात्र प्रतिस्पर्धांकडून हार पत्करावी लागली. नायजेरियाच्या कद्रीने शरथ कमलचा 8-11, 11-13, 11-13, 11-8, 11-5, 13-11 असा पराभव केला.