मनिका बात्रा उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था / मॉन्टेपिलेर (फ्रान्स)
येथे सुरू असलेल्या विश्व टेबल टेनिस चॅम्पियन्स स्पर्धेत भारताची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राने रुमानियाच्या सिडेड बेरनाडेटे सोक्सचा पराभव करत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
महिला एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 30 व्या मानांकित बात्राने 14 व्या मानांकित सोक्सचा 11-9, 6-11, 13-11, 11-9 असा (3-1) सेटसमध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना 29 मिनिटे चालला होता. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बात्राने सोक्सचा 3-2 असा पराभव केला होता. बात्राचा उपांत्यपूर्व फरीचा सामना चीनच्या तियानी बरोबर होणार आहे. चीनच्या 21 व्या मानांकित तियानीने टॉप सिडेड चीनच्या वेंग यीडीचा 11-7, 11-9, 13-11 असा पराभव केला. या स्पर्धेत पहिल्या फेरीमध्ये बात्राने अमेरिकेच्या झेंगचा पराभव केला होता. या स्पर्धेत सहभागी झालेली भारताची आणखी एक स्पर्धक श्रीजा अकुलाला पहिल्याच फेरीत प्युर्तो रिकोच्या डायझकडून हार पत्करावी लागली.