मणिशंकर अय्यर यांची गांधींवर टीका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने काँग्रेसच्या नेतृत्वावर, विशेषत: राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेवर अविश्वास व्यक्त होऊ लागला आहे. प्रथम काँग्रेसच्या मित्रपक्षांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. आता काँग्रेसमधूनच विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनीही गांधींवर टीका केल्याने काँग्रेसच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसला काही मोलाचे सल्ले दिले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाने यापुढच्या काळात केवळ आपल्या मनातील मुद्द्यांवर भर न देता जनतेच्या मनातील मुद्द्यांना हात घातला पाहिजे. जनतेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करणे आवश्यक आहे. जनतेचा विश्वास कमावल्यानेच काँग्रेसला पूर्वीचे दिवस प्राप्त होऊ शकतील. काल्पनिक मुद्द्यांवरुन सरकारवर टीका केल्याने काहीही साध्य होणार नाही, अशी स्पष्टोक्ती या मुलाखतीत मणिशंकर अय्यर यांनी केली आहे.