महाकुंभमेळ्यात भाविकांचा महापूर
प्रयागराजमध्ये पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी : संगमावर दीड ते दोन कोटी भाविकांनी मारली डुबकी,
वृत्तसंस्था/ प्रयागराज
महाकुंभमेळ्यात सोमवारी पौष पौर्णिमेला कोट्यावधी भाविकांनी पहिले स्नान केले. पवित्र स्नानाच्या पहिल्या दिवशी संगम तीरावर दुपारी 4 वाजेपर्यंत 44 घाटांवर तब्बल 1.5 कोटी भाविकांनी स्नान केले होते. त्यानंतरही भाविकांची रीघ कायम असून दिवसभरात हा आकडा दोन कोटींवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जर्मनी, ब्राझील आणि रशियासह 20 देशांमधून परदेशी भाविकही मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आज मकर संक्रांतीनिमित्त शाहीस्नान होणार असून भाविकांची उच्चांकी गर्दी अपेक्षित आहे. आता भाविक 45 दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करतील.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचे दिव्य आणि भव्य उद्घाटन झाले आहे. यावेळी, आजपासून सुरू झालेल्या आणि 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महाकुंभात 40 कोटींहून अधिक भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या दिवसापासूनच तीर्थक्षेत्र प्रयागराज येथे भाविकांची मोठी गर्दी जमू लागली आहे. कुंभमेळ्याच्या प्रत्येक दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असली तरी शाही स्नानाच्या दिवशी ही गर्दी अनेक पटींनी वाढू शकते. उद्घाटनावेळी हेलिकॉप्टरमधून भाविकांवर 20 क्विंटल फुलांचा वर्षाव करण्यात आला. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक प्रयागराजला आले आहेत. महाकुंभात आलेल्या लोकांवर हेलिकॉप्टर आणि एनएसजी कमांडो लक्ष ठेवून आहेत. दुपारपर्यंत एक कोटी भाविकांनी प्रयागराजमध्ये पवित्र स्नान केल्याचे प्रयागराज झोनचे एडीजी भानू भास्कर यांनी सांगितले.
भारताच्या श्रद्धेचा जगभरात आदर : पंतप्रधान
महाकुंभाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी ‘भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यावधी लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे!’ असे ट्विट केले. महाकुंभ 2025 हा केवळ भारतीय संस्कृतीचा उत्सव नाही तर तो संपूर्ण जगाला भारताच्या आध्यात्मिक शक्ती आणि संस्कृतीची झलक दाखवत आहे. हा भक्तीमय सोहळा प्रयागराजमध्ये सुरू झाला असून असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणेल. महाकुंभ हा भारताच्या शाश्वत आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे आणि श्रद्धा आणि सौहार्द साजरे करतो, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
हेलिकॉप्टर राईडमधून हवाई दृश्याचा आनंद
महाकुंभमेळ्यादरम्यान पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हेलिकॉप्टर राईड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे भाडे प्रतिव्यक्ती 3,000 रुपयांवरून फक्त 1,296 रुपये करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जयवीर सिंह यांनी एका अधिकृत निवेदनात ही माहिती दिली. 7-8 मिनिटांची ही हेलिकॉप्टर राईड सोमवारपासून सुरू झाली. या राईडद्वारे पर्यटक आणि भाविक प्रयागराज शहरातील महाकुंभमेळ्याच्या भव्यतेचे हवाई दर्शन घेऊ शकतील.
‘माझा भारत महान’ : विदेशी भक्तांचा नारा
महाकुंभात सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक दाखल होऊ लागले आहेत. महाकुंभाचे दिव्यत्व पाहून एका रशियन भक्ताने ‘माझा भारत महान’ अशी घोषणाबाजी केली. आपण पहिल्यांदाच कुंभमेळ्यात आलो आहोत. इथे आपल्याला खरा भारत पहायला मिळाला. या पवित्र स्थानाच्या ऊर्जेने मी थक्क झालो आहे. मला भारत फार आवडतो, असेही त्याने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या महाकुंभात 15 लाखांहून अधिक परदेशी पर्यटक येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या भक्तांमध्ये भारतीय संस्कृती आणि श्रद्धेबद्दल प्रचंड आदर दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वच्छता आणि व्यवस्थेबद्दल प्रशंसा
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील एका भक्ताने प्रयागराजमधील वातावरण अद्भूत असल्याचे सांगितले. येथील रस्ते स्वच्छ आहेत आणि लोक खूप मैत्रीपूर्ण आहेत. आम्ही सनातन धर्माचे पालन करतो आणि इथे येऊन आम्हाला मिळालेला अनुभव अविस्मरणीय आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनहून महाकुंभमेळ्याला आलेली निक्की ही भक्त येथील अद्भूत वातावरण पाहून भारावून गेली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना पवित्र स्नानाचा हा अनुभव खूप शक्तिशाली असल्याचे सांगितले.
महाकुंभ : श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम
महाकुंभ हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे. ही पर्वणी दर 12 वर्षांनी येते. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आणि मोक्ष मिळविण्यासाठी कोट्यावधी भाविक गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी आणि क्षिप्रा नद्यांच्या पवित्र पाण्यात स्नान करतात. महाकुंभाचे आयोजन धार्मिक श्रद्धा, ज्योतिषीय गणना आणि ऐतिहासिक परंपरांवर आधारित आहे. हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि एकतेचे प्रतीक असून तो देश-विदेशातील भाविकांना आकर्षित करतो. यंदा 144 वर्षांनंतर एका दुर्मिळ खगोलीय योगायोगाने महाकुंभ होत आहे.