ऑफ सिझनमध्ये ‘आंबे’ मडगाव बाजारात
मडगाव : ऑक्टोबर महिन्यात आंबे उपलब्ध होत नाहीत. मात्र, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देताना सांगे तालुक्यात तयार झालेले ‘सिंधुरी’ तसेच ‘तोतापुरी’ आंबे मडगावच्या बाजारात दाखल झाले आहेत. सिंधुरी आंबे 100 रुपयांना पाच तर तोतापुरी 100 रुपयांना 2 या दराने त्यांची विक्री केली जात आहे. यंदा पावसाने सर्व विक्रम मोडीत काढून नवा विक्रम नोंद केला आहे. पावसाळा यंदा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबला आहे. त्यामुळे आंबे, काजू यांचे पीक तसे उशिराच येणार असा सर्वांचाच समज होता. मात्र, सांगे तालुक्यातील फार्ममध्ये तयार झालेल्या आंब्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे.
मडगाव बाजारात शिरोडा येथील नरेंद्र नाईक हे आंब्याची विक्री करीत असून या आंब्यांना बऱ्यापैकी मागणी असल्याची माहिती त्यांनी दिली. बिगर हंगामातील हे आंबे लोणच्यासाठी वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले. थंडी सुरू झाली की, आंबे व काजू यांना मेहोर येत असतो नंतर फळधारणा होते. मात्र, यंदा दोन महिन्यापूर्वीच सांगे येथील फार्ममध्ये आंब्यांना मोहोर आला होता. पण, जोरदार पावसामुळे मोहोर गळून पडला. त्यात काही शिल्लक राहिली त्यातून फळधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र नाईक हे मडगाव बाजारात आंबे, केळी यांची विक्री करीत असतात. विशेष म्हणजे ‘खळातील कैऱ्या’ ही त्यांच्याकडे उपलब्ध असतात.