मंगेश चिवटे यांची बेळगावला धावती भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
शिनोळी येथे सीमावासियांसाठी तहसीलदार स्तरावरील अधिकाऱ्याची लवकरच नेमणूक होणार आहे. सीमाभागातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याची पूर्तता लवकरात लवकर करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी व वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे करण्यात आली.
मंगेश चिवटे यांनी शनिवारी सायंकाळी बेळगावला धावती भेट दिली. सांबरा येथील बेळगाव विमानतळावर झालेल्या चर्चेत विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या मंत्र्यांची अडवणूक केली जात आहे. हे प्रकार थांबविले गेले नाहीत तर यापुढेही असेच होत राहणार आहे. यामुळे सीमाभागातील नागरिकांना सीमा समन्वयापुढे आपले गाऱ्हाणे मांडता येत नसल्याची तक्रार करण्यात आली. तसेच कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या कन्नडसक्तीची माहितीही चिवटे यांना देण्यात आली.
मंगेश चिवटे यांनी फोनवरून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून शिनोळी येथे सुरू करण्यात येणाऱ्या कार्यालयाविषयी चर्चा केली. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुस्कर, आनंद आपटेकर, सागर पाटील, मनोहर कालकुंद्रीकर, अजित जाधव, अनंत पाटील आदी उपस्थित होते.