For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: बादशहाला म्हणाला, मी विठू महार.., झाला महार पंढरीनाथ

12:57 PM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
vari pandharichi 2025  बादशहाला म्हणाला  मी विठू महार    झाला महार पंढरीनाथ
Advertisement

एकदा लागोपाठ तीन वर्षे मंगळवेढ्याला दुष्काळ पडला

Advertisement

By : मीरा उत्पात 

ताशी : मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. इथे अनेक संत होऊन गेले. या संतांमधील महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संत दामाजीपंत! दामाजीपंत हे बिदरच्या बादशहाच्या पदरी काम करत होते. त्याकाळी मंगळवेढा भागावर बहामनी सुलतानाची राजवट होती. दामाजीपंतांकडे मंगळवेढा विभागाचे कुलकर्णीपण होते.

Advertisement

पैसे, धान्य रूपाने जनतेकडून सारावसुली करण्याचे काम त्यांच्याकडे होते. ते अतिशय हुशार होते. त्यांच्या बुद्धिमत्तेवर, कामकाजावर प्रसन्न होऊन बादशहाने त्यांना मंगळवेढ्याचे मामलेदार केले. एकदा लागोपाठ तीन वर्षे मंगळवेढ्याला दुष्काळ पडला. जनतेचे अतिशय हाल होऊ लागले.

माणसे अन्न अन्न करून मरू लागली सहृदयी, विठ्ठलाचे परमभक्त असलेल्या दामाजीपंतांचे मन दु:खी झाले. एकदा त्यांच्याकडे कामानिमित्ताने एक माणूस आला. त्याला दामाजीपंतांनी जेवायला वाढले. अन्न पाहून त्याला रडू आले. दामाजीपंतांनी कारण विचारले असता तो म्हणाला माझ्या घरच्या लोकांनी किती तरी दिवस झाले पोटभर अन्न खाल्ले नाही. अशीच सारी भोवतालची परिस्थिती होती.

दामाजीपंतांच्या ताब्यात धान्याचे कोठार होते. पण ते सरकारी मालकीचे होते. त्यांना जनतेची अन्नान्न दशा पाहवेना. म्हणून त्यांनी कोठारातील धान्य जनतेला वाटून टाकायचा निर्णय घेतला. मंगळवेढ्याच्या पंचक्रोशीतील माणसे दामाजीपंतांच्या कडून धान्य घेऊन चालले.

दुवा देऊ लागले. हा सारा प्रकार भोवतालच्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांनी बादशहाला कळवला. बादशहाला प्रचंड राग आला. त्याने दामाजीपंतांना पकडून आणून शिरच्छेद करण्याचा हुकूम दिला. दामाजीपंतांना नेण्यासाठी शिपाई आले. बिदरला जाताना ते विठ्ठलाला नमस्कार करण्यासाठी देवळात आले.

विठ्ठलाला म्हणाले माझ्या हातून सरकारी धान्य कोठार लुटण्याची चूक झाली आहे. मला शिक्षा भोगावी लागेल. तुझे शेवटचे दर्शन घेण्यासाठी मी आलो आहे, असे म्हणत मनापासून नमस्कार करून ते बिदरला निघाले. विठ्ठलाचा जीव कळवळला. भक्तांची अणुमात्र व्यथा क्षण एक न साहवे भगवंता तो विठू महाराचे रूप घेऊन बादशहाच्या दरबारात हजर झाला.

पूर्वी महार मंडळी निरोप किंवा द्रव्य पोहोचवण्याचे काम करत असत. बादशहाला म्हणाला, मी विठू महार. मी दामाजीपंतांकडे कामाला असतो. त्यांना दुष्काळामुळे झालेले जनतेचे हाल पहावत नव्हते म्हणून त्यांनी कोठारातील धान्य जनतेला दिले. त्यांनी मला त्या धान्याचा मोबदला घेऊन पाठवले आहे. असे म्हणून बादशहा पुढे नाण्यांचा ढीग ओतला.

एवढी नाणी पाहून दरबार चकित झाला. विठ्ठलाने पैशाचा भरणा केल्याची पावती मागितली. ती पावती मुंडाशात खोचून तो अदृश्य झाला. बादशहाचे सैनिक दामाजीपंतांना घेऊन दरबारात हजर झाले. बादशहा विठ्ठलाने दिलेल्या नजराण्यामुळे खूश होता. त्याने दामाजीपंतांना तुमच्या पदरी असलेल्या विठू महाराने रक्कम चुकती केल्याचे सांगितले. पण, पंतांनी विठ्ठलानेच हे सारे केले हे ओळखले.

त्यांनी बादशहाला माझ्या पदरी असा नोकर नाही, असे सांगत प्रत्यक्ष विठ्ठलाने येऊन हे पैसे दिल्याचे सांगितले. बादशहाला विठ्ठलाने येऊन हे सारे केल्याचे आश्चर्य वाटले. दामाजीपंतांचा अधिकार लक्षात आला. स्वत: देव दामाजीपंतांच्या मदतीस आला, हे पाहून त्याला आपली चूक कळाली.

त्याने दामाजीपंतांची माफी मागून सत्कार केला. बादशहाला विठ्ठलाचे रूप परत पाहण्याची इच्छा झाली. तो पंढरपूरला आला. दामाजीपंतांना मला देवाचे विठू महाराचे रूप दाखवा म्हणून विनंती केली. त्यावेळी दामाजीपंतांच्या विनंतीवरून विठ्ठलाने बादशहाला विठू महाराच्या रूपात दर्शन दिले.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सभामंडपात पूर्वी असलेल्या गरुड मंदिराजवळ असलेल्या कट्ट्यावर विठ्ठलाने बादशहाला दर्शन दिलेली जागा होती. आता सरकारने हे गरूडमंदिर काढले आहे. विठ्ठलाचे नि:सीम भक्त असलेले दामाजीपंत लोकोद्धाराच्या कामामुळे संतपदी पोहोचले!

Advertisement
Tags :

.