पांगुळ गल्लीत महिलेच्या बॅगेतील मंगळसूत्र लंपास
बेळगाव : साड्या खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या व्हॅनिटी बॅगमधील मंगळसूत्र पळविण्यात आल्याची घटना मंगळवार दि. 3 रोजी भरदुपारी पांगुळ गल्लीत घडली. घटनेची माहिती समजताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. भर बाजारात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी चार महिला साड्या खरेदी करण्यासाठी पांगुळ गल्ली येथील श्री एम. टेक्सटाईल या दुकानात आल्या होत्या. त्यांनी दुकानदाराकडे साड्या दाखविण्याची मागणी केली. त्यापैकी एका महिलेने आपल्याकडील व्हॅनिटी बॅग दुकानात बाजूला ठेवली. सर्वजणी साड्या पाहण्यात व्यस्त असताना एका महिलेने दुकानात प्रवेश केला.
सर्वजण साड्या पाहण्यात व्यस्त असल्याचे पाहून त्यांची नजर चुकवत त्या महिलेने व्हॅनिटी बॅग पळविली. व्हॅनिटी बॅग ठेवलेल्या जागी नसल्याचे दिसून आल्यानंतर शोधाशोध सुरू करण्यात आली. दुकान मालकाला सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहण्याची विनंती करण्यात आली. मात्र कॅमेरे बंद असल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यामुळे ज्या महिलेची बॅग चोरीला गेली होती, त्या महिलेला अश्रू अनावर झाले. काहीवेळानंतर भोई गल्लीत एक बेवारस बॅग आढळून आली. सदर बॅग पांगुळ गल्ली येथील दुकानातून लांबविण्यात आल्याचे उघडकीस आले. ही माहिती समजताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र भरदिवसा बाजारपेठेत घडलेल्या घटनेमुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.