मंगळूर-मुंबई वंदे भारत लवकरच
गोवा, सिंधुदुर्गच्या प्रवाशांनाही होणार लाभ
मंगळूर : देशभरात सध्या जवळपास सर्व राज्यांमध्ये वंदे भारत रेल्वेगाडी धावत आहे. चेअर कारनंतर रेल्वेची स्लीपर वर्जन असलेली वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची तयारी आहे. याची चाचणी देखील पूर्ण झाली असून लवकरच ही सेवा सुरू केली जाऊ शकते. याचदरम्यान भारतीय रेल्वे मुंबई ते मंगळूरदरम्यान एक वंदे भारत सुरू करण्याची तयारी करत आहे. याच्या माध्यमातून केवळ 12 तासांत हा प्रवास पूर्ण होऊ शकणार आहे. सध्या मुंबई-गोवा आणि मंगळूर-गोवा मार्गावर वंदे भारत रेल्वे धावते. परंतु याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत नसल्याने भारतीय रेल्वे आता मुंबई ते मंगळूर एकच वंदे भारत रेल्वे सेवा राबविण्याच्या तयारीत आहे. याचा उद्देश प्रवाशांची संख्या वाढविणे आहे.
केवळ 40 टक्के सीट फुल्ल
मंगळूर-गोवा वंदे भारतमध्ये सध्या केवळ 40 टक्के सीट्सच भरत आहेत, याचमुळे रेल्वेने प्रथम ही सेवा कोझिकोडपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. परंतु राजकीय विरोध पाहता हा विचार मागे पडला. सध्या मंगळूर-गोवा मार्गावर वंदे भारत स्वत:चा प्रवास केवळ साडेचार तासांमध्ये पूर्ण करते. तर दुसरीकडे मुंबई-गोवा वंदे भारत रेल्वेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांकडून समजते.