महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वडगावची मंगाईदेवी यात्रा अमाप उत्साहात

11:30 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवसाला पावणाऱ्या देवीची सर्वदूर ख्याती : हजारो भाविकांची उपस्थिती : परिसरातील रस्ते गर्दीने फुलले : खरेदीसाठी स्टॉलवर तुडुंब गर्दी

Advertisement

बेळगाव : नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असणाऱ्या मंगाई देवीची यात्रा मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली. मंगाई यात्रेनिमित्त वडगाव परिसरातील रस्ते गर्दीने फुलले होते. रस्त्यांच्या दुतर्फा मांडण्यात आलेल्या स्टॉलवर खरेदीसाठी तुडुंब गर्दी झाली होती. कोसळणाऱ्या पावसातही मंगाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी तासन्तास रांगा लावून दर्शन घेतले. वडगावच्या मंगाई देवीची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही जल्लोषात पार पडली. सकाळी धनगरी ढोलांचे वादन करत संपूर्ण वडगाव परिसरात मंदिरांच्या भेटी घेण्यात आल्या. त्यानंतर डोक्यावर ओटीचे सामान घेऊन महिला पारंपरिक ढोल वाद्यांसह मंदिर परिसरात दाखल झाल्या. मंगाई देवीला चव्हाण-पाटील घराण्याच्यावतीने ओटी भरण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजन करून सर्व देवदेवतांची आराधना करत गाऱ्हाणे उतरविण्यात आले. गाऱ्हाणे उतरविताच उपस्थित भाविकांनी देवीच्या नावाचा एकच जल्लोष केला. मंगळवारी सकाळी 9 पासून वडगाव परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. गाऱ्हाणे उतरविण्यापूर्वीच नागरिकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पुरुष व महिला भाविकांसाठी दर्शनाची स्वतंत्र सोय केली होती. भाविकांसाठी हार, फुले, ओटीचे साहित्य विक्रीचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले.

Advertisement

भाविकांची तुफान गर्दी

देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे सकाळपासूनच मोठी वाहने येळ्ळूर क्रॉसच्या पुढे सोडली जात नव्हती. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे वझे गल्लीपासून मंगाईदेवी मंदिरापर्यंत भाविकांची तुफान गर्दी दिसून आली. गृहोपयोगी साहित्य, कृत्रिम फुले, फुलदाण्या, कृत्रिम दागिने, फुगे व तत्सम खेळ, रांगोळ्या, खाद्यपदार्थ यांच्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होती. याशिवाय ठिकठिकाणी टॅट्यू काढून देण्याचेही स्टॉल मांडण्यात आले होते. तरुणाईने तिथे गर्दी केलेली दिसून आली.

मंदिर परिसरात चिखलाचे साम्राज्य

मंगाईदेवी मंदिर परिसरात एका बाजूला पेव्हर्स बसविण्यात आले असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र चिखल झाला होता. सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे खुल्या जागेवर पाणी साचले होते. यामुळे या चिखलातूनच भाविकांना ये-जा करावी लागत होती. महापालिकेकडून थोड्या प्रमाणात खडी टाकण्यात आली होती. परंतु पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे चिखल मोठ्या प्रमाणात झाला होता. या चिखलाचा सर्वाधिक फटका महिला भाविकांना बसला.

वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण

सायंकाळी 6 नंतर गर्दी वाढत गेली. येळ्ळूर रोड, धामणे रोड, यरमाळ रोड या परिसरात वाहनांची संख्या वाढल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती. अनेक चार चाकी वाहनचालकांनी रस्त्याशेजारीच वाहने पार्क केल्यामुळे दुचाकी चालकांना ये-जा करणेही कठीण झाले होते. यामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांना बराच काळ वाहतूक कोंडीमध्ये घालवावा लागला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article