मंडोळी पीकेपीएसच्या सचिवांना पदावरून कमी करा
संचालक, सभासद, ग्रामस्थांची मोर्चाद्वारे मागणी
बेळगाव : मंडोळी पीकेपीएसच्या सचिव शीतल दळवी यांच्याकडून संस्थेचे कामकाज योग्यरित्या चालविले जात नाही. उद्धटपणे वागण्यासह त्या हुकुमशाही कारभार करत आहेत. संचालक, सभासदांचा योग्य आदर न करता संस्थेचे नियम व कायदे पाळले जात नाहीत. पारित केलेल्या ठरावांच्या नोंदी रजिस्टरमध्ये नोंदविल्या जात नाहीत. त्यामुळे सचिवाविरुद्ध कारवाई करावी किवा त्यांना पदावरून कायमचे कमी करावे, या मागणीसाठी संस्थेचे संचालक, सभासद व ग्रामस्थांतर्फे दि. 8 रोजी सहकार खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून उपनिबंधकांना निवेदन देण्यात आले. संस्थेच्या संचालक व सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर केले आहेत. 23 सप्टेंबर रोजी सचिवांना कायमचे पदावरून काढून टाकण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र आपल्या पदाचा राजीनामा न देता सचिवांनी आपले कामकाज सुरू ठेवले आहे. शिवाय चुकीची कारवाई केल्याबद्दल सचिवांकडून संचालक व सभासदांना धमकावले जात आहे. त्यामुळे सचिवाविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करावी किवा त्यांना पदावरून कायमचे कमी करावे, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.