Satara News : रेशनिंग कार्डसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक अन्यथा....; महाबळेश्वर तहसीलदारांचा कठोर इशारा
महाबळेश्वर तहसीलदारांचा ई-केवायसीसाठी कठोर इशारा
महाबळेश्वर : रेशनिंग कार्डची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ई केवायसी न केल्यास अशा शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन मस्के यांनी दिली. ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांच्यावर आता प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा न केल्यास संबंधित लाभार्थीचे धान्य बंद केले जाईल किंवा त्यांची शिधापत्रिका थेट रद्द होईल, अशी माहिती तहसीलदार सचिन मस्के यांनी दिली आहे.
शासनाने रेशनिंग कार्डधारकांसाठी ई-केवायसी करणे सक्तीचे केले आहे. यासाठी प्रशासनाकडून वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. सुरुवातीला ३१ मार्च २०२५ आणि त्यानंतर ३१ मे पर्यंत ही मुदत वाढवली. मात्र, तरीही अनेक लाभार्थीनी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत, शिधापत्रिकेवर ज्या व्यक्तींची नावे आहेत, त्या व्यक्ती त्याच आहेत का आणि आधार क्रमांक जुळतो का, यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे.