Satara : तासवडे एमआयडीसीमध्ये घनकचराचे कोलमडले व्यवस्थापन ; नागरिक आणि शेतकऱ्यांना त्रास
एमआयडीसी परिसरातील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य
उंब्रज : तासवडे एमआयडीसीतील घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले असून या कचऱ्याचा भार वराडे, तासवडे व तळबीड परिसरातील नागरिक आणि शेतकरी सहन करत आहेत. एमआयडीसी परिसरातून वाहणारे केमिकल मिश्रित पाणी ओढ्यांमध्ये मिसळत असल्याने विहिरी व कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे.
मानवी आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करत असताना, वन्यप्राण्यांच्या अस्तित्वावरही गदा येत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की गयावया करुनही शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकायला कुणाला वेळ नाही. या प्रश्नावर प्रशासनही निष्क्रिय झाल्याचे सध्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मते, काही उद्योजक केमिकल मिश्रित कचरा, रॉ मटेरियल आणि विविध उपद्रव्यांनी भरलेली घाण शेताच्या लगतच्या वनराईत किंवा थेट शेतजमिनीत टाकत आहेत. वर्षानुवर्षे निर्माण झालेल्या या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी परिसराला दुर्गंधीचे साम्राज्य आले आहे. दुर्गंधीमुळे मानव आणि जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चरण्यासाठी येणाऱ्या दुभत्या जनावरांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
दुसरीकडे, पावसाळ्यात एमआयडीसीकडे असलेले केमिकल मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात शिवारामध्ये पसरते. या दूषित पाण्यामुळे पिकांची वाढ खुंटते, पाने जळतात आणि उत्पादनावर थेट परिणाम होतो. शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान प्रचंड असून, प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे दिसत असून, घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र स्पष्ट होते. याकडे एमआयडीसी प्रशासनाने लक्ष न दिल्याने रोष वाढत आहे.